ओरिगामी कलेतून घडवले आकाशकंदील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : ते विद्यार्थी-विद्यार्थिनी मजेत कागदांना घड्या घालण्यात रमले होते. त्या घड्यांची तंत्रशुद्ध गुंफण करून त्यातून सुबक आकाशकंदील तयार झाला की, आनंदाचे चित्कार त्यांच्या तोंडून निघत होते. आपली कलाकृती पाहिल्यावर घरी कसं कौतुक होईल, याबद्दलच्या गप्पाही रंगल्या होत्या. 

पुणे : ते विद्यार्थी-विद्यार्थिनी मजेत कागदांना घड्या घालण्यात रमले होते. त्या घड्यांची तंत्रशुद्ध गुंफण करून त्यातून सुबक आकाशकंदील तयार झाला की, आनंदाचे चित्कार त्यांच्या तोंडून निघत होते. आपली कलाकृती पाहिल्यावर घरी कसं कौतुक होईल, याबद्दलच्या गप्पाही रंगल्या होत्या. 

टिळक रस्त्यावरील "न्यू इंग्लिश स्कूल'ची ओळख सांगताना गेल्या वर्षीपर्यंत मुलांची शाळा असा उल्लेख केला जायचा. यंदा या शाळेत मुलींनाही प्रवेश दिला गेला आणि त्यातल्या बऱ्याचजणी ओरिगामी क्‍लबमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या कागदी कलाकृती घडवू लागल्या. ही कला शिकविणारे शिक्षक देविदास झोडगे म्हणाले, ""आमच्या शाळेत दिवाळीची सुटी लागायच्या दोन-तीन आठवडेआधी आकाशकंदील तयार करायचा उपक्रम चालतो. शिकताना "पहिला कंदील कच्चा', असं मुलं म्हणतात. दुसरा कंदील छान होतो. आणखी एक कंदील शाळेसाठी आणि गरिबांच्या वस्तीत जाऊन लावण्यासाठी मुलं तयार करतात.'' 

परिणिता, सिद्धी व राधा यांनी पहिल्यांदाच ही गंमत अनुभवली. पीयूषानं सांगितलं, की पाठ्यपुस्तकात कंटाळवाणी वाटणारी भूमिती आकाशकंदील करताना फारच मस्त वाटली. हर्षद, सुजल आणि नीलकृष्ण यांनी निरनिराळ्या आकाशकंदिलांच्या रचनेत त्रिकोण, पंचकोन, षटकोन आल्यावर खूप भारी वाटल्याचं सांगितलं. साहिलनं सांगितलं की, शाळेतल्या आमच्या ओरिगामी क्‍लबमध्ये आठवड्यात एकदा नवीन वस्तू शिकायला मिळतात. 

दिवाळी जवळ आल्यावर आम्हाला कुतूहल वाटतं की, या वेळी कुठल्या प्रकारचा आकाशकंदील शिकवतील. पार्थ म्हणाला, की कागद कापल्यावर उरलेल्या लांब पट्ट्या आम्ही वाया जाऊ न देता त्यांच्याच झिरमिळ्या बनवून कंदील सजवले.'' 
आपल्याबरोबरच काही झोपडपट्टी वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या गरीब मुलांच्या दारासमोर आपण प्रेमाने कंदील लावणार आहोत, आपल्या तेजोमय शुभेच्छांनी त्यांचं घर रंगीत प्रकाशकिरणांनी न्हाऊन निघणार आहे, या कल्पनेनं या सर्व विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 
 

Web Title: Akashkandil originated from Orgami art