"सेल्फी' ठरले सर्वोत्कृष्ट !

"सेल्फी' ठरले सर्वोत्कृष्ट !

पुणे - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकाचा मान यंदा "सेल्फी‘ या नाटकाने पटकावला, तर "सं. संशयकल्लोळ‘ला सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाचा पुरस्कार देण्यात आला. नाट्याचार्य गो. ब. देवल यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा योग, पुरस्कारांसाठी प्रथमच अमलात आणण्यात आलेली नामांकनाची पद्धत व ज्येष्ठ मान्यवरांसह आघाडीच्या कलावंतांची हजेरी या सगळ्यांमुळे मुंबईत पार पडलेला यंदाचा हा सोहळा रंगतदार ठरला. 

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना समारंभाच्या प्रमुख पाहुण्या कांचन सोनटक्के यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते चंदू डेंग्वेकर यांना नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, मध्यवर्ती नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्यवाह दीपक करंजीकर, कोशाध्यक्ष लता नार्वेकर, अभिनेते रमेश भाटकर, अशोक शिंदे व अन्य पदाधिकारी या वेळी रंगमंचावर उपस्थित होते. 

गतवर्षी व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्या नाटकांमधील उल्लेखनीय वैयक्तिक कामगिरीसाठी मिळालेल्या विविध नामांकनांमधून अंतिम विजेत्यांवर या सोहळ्यात पुरस्कारांची मोहोर उमटवण्यात आली. सर्वोत्कृष्ट नाटककाराचा मान "इंदिरा‘ या नाटकासाठी रत्नाकर मतकरींना मिळाला, तर "सेल्फी‘साठी अजित भुरेंना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. मधुरा वेलणकर (हा शेखर खोसला कोण आहे) व किरण माने (परफेक्‍ट मिसमॅच) हे अभिनय पुरस्कारांचे मानकरी ठरले. उमा पळसुळे देसाई व राहुल देशपांडे (सं. संशयकल्लोळ) हे सर्वोत्कृष्ट गायक अभिनेते ठरले. याशिवाय सिद्धार्थ जाधव, ऋजुता देशमुख, रोहित हळदीकर व सुशील इनामदार हे अभिनयाच्या विविध विभागांत पुरस्कार विजेते ठरले. तांत्रिक कामगिरीसाठी प्रदीप मुळ्ये (नेपथ्य ः दोन स्पेशल), शीतल तळपदे (प्रकाशयोजना ः शेखर खोसला), परीक्षित भातखंडे (पार्श्‍वसंगीत ः तिन्हीसांज) व विक्रम गायकवाड (रंगभूषा ः इंदिरा) यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 

"सकाळ‘चे उपसंपादक राज काझी यांना या सोहळ्यात अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते समीक्षणाचा पुरस्कार देण्यात आला. पुणे नाट्यपरिषदेचा गो. रा. जोशी पुरस्कार व रंगतसंगत प्रतिष्ठानच्या माधव मनोहर पुरस्कारापाठोपाठ मध्यवर्ती नाट्यपरिषदेचा हा वि. स. खांडेकर पुरस्कार मिळवत त्यांनी नाट्यसमीक्षा लेखन पुरस्कारांची हॅटट्रिक साधली आहे. या आधी सांस्कृतिक पत्रकारितेसाठी मिळालेले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व बालगंधर्व परिवाराचे पुरस्कारही त्यांच्या नावे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com