पुणे : स्वतःच्या तहानलेल्या मुलीसाठी अक्षय कुमार झोपडीत

रामदास वाडेकर
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मावळकरांच्या पाहुणचाराने भारावला अक्षयकुमार

टाकवे बुद्रूक (पुणे) : वेळ सकाळी साडेआठची...ठिकाण पवन मावळातील शिळींबची शिंदेवाडी...एक व्यक्ती मोटारीतून उतरून झोपडीच्या दारात येऊन पाणी मागतो.... झोपडीतील ज्येष्ठ दांपत्य त्या चुमरडीला पाणी तर देतातच. पण दोघांनाही घरात बोलावून त्यांना चहा आणि दिवाळीचा फराळ देतात....त्यानंतर तो व्यक्ती त्यांना आपली ओळख करून देतो...दारात आलेला तो व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नव्हे; तर तो होता बॉलिवूडस्टार अक्षय कुमार. झोपडीत राहणाऱ्या "त्या' मावळकरांनी केलेल्या प्रेमळ पाहुणचाराने अक्षयकुमारही भारावून गेला.

शिळिंब परिसरात हिलटन हॉटेल्समध्ये सुटीच्या काळात अनेक सेलेब्रिटी, राजकीय व्यक्ती, परदेशी पर्यटक पर्यटनासाठी दरवर्षी येत असतात. तुंग, तिकोण्याच्या कुशीत असलेला हा पवना धरणाचा पाणलोट क्षेत्राचा परिसर पर्यटकांना मोहित करतो. दिवाळीच्या सुटीच्या निमित्ताने अक्षयकुमार या परिसरात आला होता. सकाळी मोटारीने अक्षयकुमार निसर्गाचे अनोखे रूप न्याहाळत चालला होता. त्याच्यासमवेत त्याची छोटी मुलगी नितारा होती. निताराला तहान लागली. मात्र, परिसरात दुकान नसल्याने पाणी मिळत नव्हते. त्यामुळे शेवटी तो शिंदेवाडीत एका झोपडीसमोर थांबला. मोटारीतून उतरून तो मुलीला घेऊन तो तेथील झोपडीजवळ गेला. तेथे बबन ढमाले आणि त्याची पत्नी द्रोपदा हे ज्येष्ठ दांपत्य होते. द्रोपदा यांना अक्षयकुमार यांनी मुलीसाठी पाणी देण्याची विनंती केली. त्यावेळी ढमाले दांपत्याला त्यांना झोपडीत बोलावले. त्यांना बसायला टाकले. त्यांनी दोघांना पाणी दिले. तसेच चहा आणि घरात असलेले दिवाळीचा फराळ दिला. त्यावेळी घरात आलेला व्यक्ती कोण आहेत, याची पुसटशीही कल्पना ढमाले यांना नव्हती. पण आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला आदराची वागणूक देवून आपल्याकडे आहे, तसा पाहुणचार करण्याची ग्रामीण भागात परंपरा आहे. त्यानुसार त्यांनी पाहुणचार केला.

अक्षयकुमारने स्वतःहून आपली ओळख करून दिली. मी हिरो अक्षयकुमार. त्यानंतर या दांपत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी केलेल्या पाहुणचाराने अक्षयकुमार पूर्णपणे भारावला होता. त्यांचे आभार मानून तो झोपडीबाहेर पडला. दरम्यानच्या काळात शिंदेवाडीत अक्षयकुमार आल्याची बातमी पोचली होती. गावातील मुले गोळा झाली. त्यांनी अक्षयकुमारसोबत सेल्फी घेतले. त्यानंतर शिंदेवाडीकरांचा निरोप घेऊन अक्षयकुमार मोटारीने मार्गस्थ झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar At the door of the hut for his Thirsty daughter