कुलदैवतांना नैवेद्य अन्‌ पूर्वजांप्रती कृतज्ञता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

पुणे - अक्षय तृतीया अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांना आंब्यांचा नैवेद्य दाखवून ‘कर’ आणि ‘केळी’चे (मातीची सुगडी) पूजन करून पूर्वजांप्रती अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. काही मंदिरांत मोगरा महोत्सव, तर काही मंदिरांत आंब्याची आरासही करण्यात आली होती. जैनधर्मीय नागरिकांनी वर्षीतप पारणे उत्सवानिमित्त मिरवणूक काढली. 

वैशाख शुद्ध तृतीयेनिमित्त सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांतर्फे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. मठ-मंदिरांमध्ये सकाळपासून अभिषेक व सामूहिक उपासना झाली. जैनधर्मीयांनी उभारलेल्या २४ तीर्थंकरांच्या मंदिरांमध्ये पारणे उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. महिलांनी चैत्रगौरीचे पूजन केले. या सणापासून आंबा खाण्याची पद्धत असल्याने घरोघरी आमरसाचा बेतही आखला होता. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिरात ‘श्रीं’च्या समोर अकरा हजार हापूस आंब्याची सजावट करण्यात आली. ‘‘देसाई बंधू आंबेवाल्यांतर्फे मंदार देसाई दरवर्षी ‘श्रीं’स आंब्याचा महानैवेद्य दाखवितात. प्रसाद म्हणून शनिवारी (ता.२९) या आंब्यांचे ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना वाटप करण्यात येईल,’’ असे ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले. 

गुरुवार पेठेतील गोडीजी पार्श्‍वनाथ जैन टेंपल ट्रस्टचे विश्‍वस्त राजीव शहा म्हणाले, ‘‘वर्षीतपानिमित्त राजरक्षित विजयजी म. सा., मुनी नवरक्षित विजयजी यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. पारणे उत्सवाची सांगता शनिवारी (ता.२९) सकाळी साडेसहा वाजता आदिनाथ भगवान यांच्या मूर्तीस इक्षुरसाच्या म्हणजे उसाच्या रसाच्या अभिषेकाने होईल. यानिमित्त कोंढवा येथील वर्धमान सांस्कृतिक भवन येथे सकाळी साडेदहा वाजता पारण्याचा कार्यक्रम होईल.’’

Web Title: akshay tritiya event