तीच गाणी, तेच संगीत... तरीही ‘वन्स मोअर’!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित मैफलीत रसिकांनी अनुभवला स्मरणरंजनाचा देखणा प्रवास

अक्षय तृतीयेनिमित्त आयोजित मैफलीत रसिकांनी अनुभवला स्मरणरंजनाचा देखणा प्रवास

पुणे - तीच गाणी, तेच संगीत आणि त्यातील प्रत्येक गाण्याचं श्रोत्यांवर असणारं गारूडदेखील अगदी तेच! एक संपलं की दुसऱ्याची वाट पाहायला लावणारं. आता पुढे कुठलं गाणं ऐकायला मिळेल, याचीच आस आजही श्रोतृवृंदातील प्रत्येकास लागली होती. गेली अनेक वर्षे आहे तशीच; वर्षानुवर्षे मनांत आणि कानांत रुंजी घालणारी. बाबूजींची अर्थात संगीतकार सुधीर फडकेंची अनेक अजरामर गाणी त्यांच्याच आवाजाचं प्रतिबिंब म्हणावं अशा सुरेल आवाजात ऐकवत गायक- संगीतकार श्रीधर फडके यांनी आज पुन्हा एकदा रसिकांना स्मरणरंजनाच्या देखण्या प्रवासावर नेलं.

‘सकाळ माध्यम समूह’ आणि रांका ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अक्षय तृतीया पहाट- ठेवा परंपरेचा, उत्सव नावीन्याचा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना शुक्रवारी हा प्रवास घडला. ‘सकाळ’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक (विपणन) शैलेश पाटील, रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका व वास्तुपाल रांका आदी या वेळी उपस्थित होते.

फडके यांच्या आवाजाची जादू अशी, की प्रत्येक गीतागणिक श्रोत्यांचा ‘वन्स मोअर’चा आग्रह आणि गाण्यांना दिली जाणारी उत्स्फूर्त साथ वाढतच जाताना पाहायला मिळाली. सुटीचा दिवस नसतानाही या पहाटेचा उत्साह बालगंधर्व रंगमंदिरात भरभरून ओथंबताना दिसत होता. फडके यांना मिळालेली गायिका शिल्पा दातार-पुणतांबेकर आणि शेफाली कुलकर्णी यांची गायनसाथ, तर अपूर्वा मोडक आणि योगेश देशपांडे यांची निवेदनसाथ यामुळे ही पहाट अधिकच खुलत गेली.

देव देव्हाऱ्यात नाही...
‘देव देव्हाऱ्यात नाही’, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘कुठे शोधिसी रामेश्वर’, ‘सांज ये गोकुळी’ (संगीत- श्रीधर फडके), ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ अशा अनेक अवीट गोडीच्या गीतांनी या पहाटेत रसिकांना अक्षरशः वेड लावलं. यातील कित्येक गीते रसिकांना मुखोद्‌गत असल्यामुळे प्रेक्षागृहातून ती उत्स्फूर्तपणे गुणगुणली जात होती. त्यातच फडके यांनी ‘तुझ्या व्हटावर येऊ दे व्हय व्हय व्हय...’ सारखं शांता शेळके यांनी लिहिलेलं कोकणी गीत गाऊन किंवा मग गरब्याच्या धाटणीत रचलेल्या खेमटा तालातल्या रचना गाऊन रसिकांना आपल्या प्रयोगशील संगीताची गोडीही चाखवली.

Web Title: akshay tritiya pahat programme by sakal