Ashadhi Wari : पालखी प्रस्थानाला मिळणार मर्यादित प्रवेश; प्रत्येक दिंडीत किती वारकऱ्यांना मिळणार संधी? alandi Ashadhi Wari palkhi sohala entry varkari opportunity | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadhi Wari

Ashadhi Wari : पालखी प्रस्थानाला मिळणार मर्यादित प्रवेश; प्रत्येक दिंडीत किती वारकऱ्यांना मिळणार संधी?

आळंदी - यंदाच्या आषाढी वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यात प्रत्यक्ष प्रस्थानाच्या दिवशी (ता. ११ जून) प्रत्येक दिंडीतील मोजक्या ७५ वारकऱ्यांना आणि पालखीला खांदा देणाऱ्या केवळ ५० आळंदीकरांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अनावश्यक गर्दी व चेंगराचेंगरीसारखे प्रसंग टाळण्यासाठी आळंदी देवस्थान, वारकरी, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीतील चर्चेप्रमाणे मर्यादित लोकानांच प्रवेश देणार आहे.

याबाबत पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी माहिती दिली की, दरवर्षी गर्दीमुळे प्रस्थान सोहळा उशिरा पार पडतो. वारकऱ्यांना पुन्हा पहाटे उठून वाटचाल करावी लागते. प्रस्थान वेळेत आणि सुरळीत निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी देवस्थानने अनेक बैठका यापूर्वी वारकऱ्यांसोबत घेतल्या. सर्वांना निर्णयाची कल्पना दिलेली आहे.

भाविकांची चेंगराचेंगरी होऊ नये, या अनुषंगाने निश्चित रुपी एक मर्यादा आहेत. त्या भाविकांच्या सोहळ्यास कुठे बंधन म्हणून नाही, तर फक्त गर्दी आणि चेंगचेंगरी होऊन दुर्घटना होऊ नये, यासाठी निर्णय घेतला. त्याचप्रमाणे सोहळ्यातील वाटचालीत पालखी मार्गावर येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी मोकळी जागा असेल, त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था व सावलीची व्यवस्था करावी. तसेच, पायी पालखी सोहळ्यादरम्यान निश्चित रुपी भाविकांना व थंड पेय व ताक याची सोय करावी.

माउलींच्या रथाला जुंपणाऱ्या बैलजोडीची मिरवणूक

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीची आज (ता.१) आळंदीकरांनी विठू-माऊलीच्या नामाचा गजर करत फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात मिरवणूक काढली. यंदाच्या वर्षी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील तुळशीराम भोसले यांच्या घराण्याचा आहे.

कर्नाटकमधून विकत आणलेल्या खिलारी बैलजोडीला रोज खुराक, वैद्यकीय तपासणी तसेच शारीरिक मेहनत करून घेतली जाते. सकस आहार दिला जात आहे. दरम्यान, आषाढी वारीतील माउलींचे पालखी प्रस्थान ११ जूनला आहे. तर १२ जूनला पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. या निमित्ताने आज आळंदीकरांनी मानाच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक काढली. या वेळी पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर सागर भोसले आदी उपस्थित होते.

आळंदीकर फक्त पन्नासच...

दरवर्षी प्रस्थान दिवशी पालखीला खांदा देण्यासाठी आळंदीकरांची गर्दी असते. यावरही नियंत्रण आणले आहे. केवळ पन्नास आळंदीकरांनाच प्रस्थान सोहळ्यात पालखीला खांदा देण्यासाठी प्रवेश दिला जाणार असल्याचे देवस्थान आणि आळंदीकरांच्या बैठकीत ठरले. यावेळी बबनराव कुऱ्हाडे, प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गीलबिले, राहुल चिताळकर, विलास घुंडरे यांच्यासह पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

पत्रकारांचीही संख्या कमी

प्रस्थान काळात पत्रकारांचीही संख्या कमी करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती. यामुळे यंदा पत्रकारांच्या संख्या मर्यादित केली जाणार आहे. यामधे प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया पत्रकारांना फोटो पास देवस्थान प्रतिवर्षीप्रमाणे देतील. मात्र, हौशी छायाचित्रकार, यूट्यूब व फेसबुक याद्वारे प्रसारण करणाऱ्यांवर बंधन असून, प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे यांनी दिली.