उन्हाळ्यात नाही, तर ऐन हिवाळ्यात आळंदीकरांवर आली टॅंकरची वेळ

विलास काटे
Monday, 11 January 2021

पाणीपुरवठा पूर्ववत कधी होईल, याबाबत प्रशासन पदाधिकारी यांच्यात एकमत नाही. ९०च्या दशकात आळंदीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असे.

आळंदी (पुणे) : शहराला पाणी पुरवठा करणारी सिद्धबेट येथील इंद्रायणी नदीवरील मुख्य जलवाहिनी गेल्या काही दिवसांपूर्वी फुटल्याने आळंदीत पाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. चार वर्षांपूर्वी निवडणुकीत शुद्ध पाणी पुरवठ्याचे आश्वासन देत 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या सेना-भाजपच्या नगरसेवकांनी चार वर्षांत नागरिकांना पिण्यासाठी जारने विकतचे पाणी घेण्याची वेळ आणली. आता तर पाणीपुरवठ्याचे काम नियोजन शून्य असल्याने आळंदीकरांवर वापरासाठीही टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आणली.

पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात​

आळंदीसाठी राज्य सरकारने भरघोस निधी दिला. आघाडी सरकारच्या काळात साडे पाच कोटीतून नवा जलशुद्धीकरण केंद्र उभारले. सतरा कोटींची शहरांतर्गत पाईपलाईन आणि सहा जलकुंभ बांधले. पाणी शुद्धीकरणासाठी वार्षिक एक ते दीड कोटी रुपयांपर्यंत खर्च पालिका करते. तरीही आळंदीत गेल्या आठवडाभरापासून पाण्याची टंचाई आहे. सिद्धबेटजवळील बंधाऱ्यावरील फुटलेली मुख्य जलवाहिनी अद्याप दुरूस्त झाली नाही. मंगळवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळित होण्याची चिन्हे नाहीत. अनेक नागरिक टॅंकरने पाणी वापरासाठी विकत घेत आहे. आता तर नागरिकांचा रोष वाढल्याने पालिकाच टॅंकर पुरवेल, असे पालिकेकडून सांगितले जात आहे. 

सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह​

याबाबत नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर म्हणाल्या की, 'जलवाहिनीची दुरुस्ती सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे लोक सहकार्य करत नाहीत. तीर्थक्षेत्रातून पाईपलाईनचे काम निकृष्ट झाले. मुख्याधिकारी यांना टॅंकरने पाणी पुरविण्याबाबत कळवले आहे. सायंकाळपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत होईल.'

मुख्याधिकारी अंकुश जाधव म्हणाले, 'जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असून मंगळवार सकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल. सध्या नागरिकांना पाच टँकरची सोय केली आहे. प्रभागनिहाय टॅंकर पुरविले जात असून गावठाण आणि काळे कॉलनीत टॅंकर पाठविले. नागरिकांनी पाण्यासाठी पालिकेत संपर्क साधावा. तसेच प्रत्येक प्रभागात एक कर्मचारी टॅंकरची माहिती देण्यासाठी नियुक्त केला आहे.'

धक्कादायक! पुण्यात प्रसूतीवेळी बाळासह आईचा मृत्यू; शिकाऊ डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

पाणीपुरवठा पूर्ववत कधी होईल, याबाबत प्रशासन पदाधिकारी यांच्यात एकमत नाही. ९०च्या दशकात आळंदीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. आता कोट्यावधी रुपये खर्चूनही गेल्या चार वर्षात हाच अनुभव आळंदीकरांना आला. दिवसामागून दिवस गेले. शुद्ध पाणी तर सोडाच, पण वापरासाठीचे पाणीही वेळेत सोडले जात नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alandi citizens buy Water Tankers after damaged water pipeline