
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले असून, वारकऱ्यांना यंदाच्या कार्तिकी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण आरोग्यसेवा देणार आहे.
आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले असून, वारकऱ्यांना यंदाच्या कार्तिकी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण आरोग्यसेवा देणार आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीसह शहरात इतरत्र चार ठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य सुविधा सुसज्ज ठेवणार असल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणपत जाधव यांनी दिली.
आळंदीत मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत 30 खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. शहरातील खासगी रुग्णालयातही आरोग्यसेवेसाठीच्या सूचना दिल्या आहेत. तीन सत्रांत चोवीस तास आरोग्यसेवा दिली जाणार असून, दोन वैद्यकीय अधिकारी, दोन अधिपरिचारिका कार्यरत राहणार आहेत. कार्तिकी वारीसाठी पंधरा वैद्यकीय अधिकारी, वीस अधिपरिचारिका, पंचवीस परिचर, सहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहा औषधनिर्माण अधिकारी, पंधरा अंतरवासीय विद्यार्थी, आठ "क्ष' किरणतज्ज्ञ, चार रुग्णवाहिका अशी विभागणी केली आहे.
साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे 20 कर्मचारी आणि12 स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. परिचारिका, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, वैद्यकीय अधिकारी असे एकूण 50 जादाचे कर्मचारी वारी काळात वारकऱ्यांना चोवीस तास वैद्यकीय सेवा पुरविणार आहेत. विभागवार रचना करून चाकण चौक, दर्शनबारी, वडगाव रस्ता, माऊली मंदिर, गणेश मंदिर, घाट परिसर या ठिकाणी आरोग्य कर्मचारी रुग्णांना बाह्यरुग्ण सेवा देतील.
सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिकाही प्रमुख चौकांत वारकऱ्यांना तत्काळ उपलब्ध होतील अशा ठिकाणी उभ्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रुग्णालयाच्या वतीने आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यान्वित केला जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
महावितरणकडून फिरते पथक
वीज मंडळाचे सहायक अभियंता विजय पाटील म्हणाले, ""यात्रा काळात चोवीस तास भारनियमनमुक्त वीजपुरवठा केला जाईल. सध्या वीजवाहक तारांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. आळंदी पालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र रोहित्र असून, चोवीस तास पाणीपुरवठा केंद्र सुरू राहावे, यासाठी वीजपुरवठा अखंड राहील. याशिवाय मरकळ धानोरे, भोसरी येथील वीज उपकेंद्रातून ऐन वारी काळात गरज पडल्यास वीजपुरवठा घेतला जाईल. वारीकाळात नियंत्रण कक्षासाठी चार कर्मचाऱ्यांचे फिरते पथक राहील.''