आळंदी - माऊलींच्या पादुका समाधीजवळ विसावल्या 

alandi
alandi

आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पायी वारी पालखी सोहळा परंपरेने आळंदी मंदिरात हरिनाम गजरात दशमीला पंढरपुरहून परत येतो. परंपरा जपत माऊलींच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत झाली आणि माऊलींच्या पादुका समाधीपुढे विसावल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आषाढी पायी वारी झाली नाही. यंदा सरकारच्या वतीने बसद्वारे दोन दिवसांची वारी करून माऊलींच्या पादुका कारंजे मंडपात (ता.२)विराजमान करण्यात आल्या होत्या. 

तिथी प्रमाणे दशमीला म्हणजे आज माऊलींच्या पादुका समाधीजवळ विसावतात. उद्या एकादशीला आषाढी वारीची सांगता होत असते. त्यामुळे बुधवारी सायंकाळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात पादुका देऊन मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळमृदंगाच्या गजरात माऊलींच्या पादुका बाळासाहेब आरफळकर यांनी समाधीसमोर ठेवल्या. आरती झाली. यावेळी प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार उपस्थित होते. 

आळंदीत कमला एकादशी वारीची सांगता ; मंदिर दर्शनास बंद राहणार
पालखी सोहळ्याचे परंपरेतील आषाढ कृष्ण एकादशी अर्थात कमला एकादशी गुरुवारी (दि. १६) आळंदीत साधेपणाने शासनाने दिलेल्या आदेशानुसार मंदिर दर्शनास बंद आहे. मात्र मंदिरात वारीचे परंपरेचे कार्यक्रम मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. 

आळंदीत दरवर्षी आषाढ वारीची सांगता हजारो भाविकांच्या उपस्थितीत होत असते . मात्र, यावर्षी वारीवर कोरोंना महामारीचे सावट असल्याने गुरुवारी एकादशी दिनी माऊलींच्या पादुकांची पालखीची नगरप्रदक्षिणा रद्द करण्यात आली आहे. केवळ मंदिरात पादुका मंदिर प्रदक्षिणा होईल. दरम्यान सोहळ्यातील परंपरेने हजेरीचा कार्यक्रम मानकरी, दिंडीकरी यांना नारळ प्रसाद वाटप मांदिरातील मुक्ताई मंडपात होणार असल्याचे वीर यांनी सांगितले. भाविकांनी माऊली मंदिर परिसरात दर्शनास गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com