
संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संतविचार गरजेचे असून, त्यांचे संस्कार प्राथमिक शिक्षणापासून देण्याच्या दृष्टीने श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ यांचा प्रथमच स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येणार.
Dnyaneshwari : शाळेतच रुजणार आता ज्ञानेश्वरीचे बीज
आळंदी - संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संतविचार गरजेचे असून, त्यांचे संस्कार प्राथमिक शिक्षणापासून देण्याच्या दृष्टीने श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ यांचा प्रथमच स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून, त्यात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पुढाकार घेतला आहे.
आळंदीत सुरू असलेला ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या आध्यात्मिक उपक्रम राज्यभर पोचविण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्याचे पालकत्व घेण्याचा निर्णय आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी जाहीर केला. ‘सकाळ’ही या उपक्रमाला सहकार्य करणार आहे.
आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या वतीने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमातून ज्ञानेश्वरीचे विचार शालेय मुलांना शिकविले जात आहेत. याच धर्तीवर खेड तालुक्यातील शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यासंदर्भात संस्थानामध्ये बैठक आयोजित केली होती. या वेळी आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, स्वामी निरंजननाथ महाराज, अजित वडगावकर, प्रकाश काळे, उमेश महाराज बागडे, प्राजक्ता हरफळे, विश्वंभर पाटील, श्रीधर सरनाईक, विलास वाघमारे, प्रदीप काळे, हेमांगी कारंजकर, अॅड सचिन काळे, अॅड विष्णू तापकीर, दीपक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी स्वामी निरंजननाथ यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उमेश महाराज बागडे यांनी केले.
आळंदीत सुरू असलेला उपक्रम
संत ज्ञानेश्वर विद्यालयात २०२२ पासून उपक्रम
ज्ञानेश्वरीवरील अभ्यासक्रमासाठी आठवीतील अडीचशे विद्यार्थ्यांचा सहभाग
हरिपाठ पाठांतर आणि अर्थविवेचन चौथी ते सहावीतील साडे पाचशे विद्यार्थी सहभागी
अशी होते परीक्षा
ओळख ज्ञानेश्वरीसाठी वर्षांतून दोनदा परीक्षा
लेखी व तोंडी पन्नास गुणांची परीक्षा
दर आठवड्याला चाचणी परीक्षा
दहा मुलांना बक्षीस दिले जाते
कशासाठी हा उपक्रम
आध्यात्मिक मूल्यसंस्कार व्हावे
मुलांमध्ये संतविचार, वाङ्मय पोचावे
मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा
मुलांत सभाधीटपणा यावा
असा चालतो उपक्रम
चौथीच्या विद्यार्थ्यांकडून हरिपाठ वाचून घेतला जातो
पाचवी ते सहावी विद्यार्थ्यांना हरिपाठ पाठांतर आणि स्पर्धा घेतली जाते
सातवीला हरिपाठावर अर्थ विवेचन केले जाते
आठवीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीवर विविध विषयांना अनुसरून शिकवले जाते
गणेशवंदन, गुरू, परीक्षा, एकाग्रता, श्रवण, अवधान, ज्येष्ठांचा आदर, जीवन एक अभ्यास, समता, समाज व्यवस्था या विषयावर ज्ञानेश्वरीतील ओव्यांची निवड करून सोप्या भाषेत दिले जाते शिक्षण
चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांकडूनच हरिपाठाचे शिक्षण
ज्ञानेश्वरीचे शिक्षण सुभाष महाराज गेठे, भागवत महाराज साळुंके, उमेश महाराज बागडे, श्रीधर घुंडरे हे देतात
पालकांना बोलावून आत्मविश्वास आणि गुणात्मक परिवर्तनाबाबत बदल जाणून घेतला जातो
आळंदीमध्ये शालेय स्तरावर सुरू असलेला ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’चा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना या संतविचारांच्या अभ्यासक्रमाचा निश्चित चांगला फायदा होईल. यासाठी या उपक्रमाचे पालकत्व स्वीकारून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
- योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान
ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमास प्रसिद्धी माध्यमांमुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी आणि पालकवर्गांसाठी अशा उपक्रमातून चांगले कुटुंब तयार होऊन आदर्श समाज निर्माण होण्यास मदत होईल.
- प्रकाश काळे, अध्यक्ष, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती
विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ हा उपक्रम दीड वर्षापूर्वी सुरू केला. रविवारी सुटीचा वार असूनही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाची जोड देण्याचा ‘आळंदी पॅटर्न’ इतर शाळांनीही राबविण्याची गरज आहे.’
- अजित वडगावकर, सचिव, संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी