आळंदीच्या अतिक्रमणांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

आळंदी - आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरातील बेकायदा व्यावसायिकांवर अतिक्रमण विरोधी कारवाई न करता स्थानिक पालिका प्रशासन आणि पदाधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याची तक्रार स्थानिक कार्यकर्ते संदीप कायस्थ यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे.

तक्रार अर्जात कायस्थ यांनी म्हटले आहे की, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराभोवती अनेक दुकानदारांचे अतिक्रमण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ यात्रा कालावधीतच जुजबी स्वरूपात अतिक्रमणांवर कारवाई केली जाते. मात्र, सरसकट अतिक्रमण काढले जात नाही. वास्तविक आळंदी शहर विकास आराखड्यात सरकारने मंदिर परिक्रमा विकसित करण्यासाठी अतिक्रमण काढण्याबाबतची तरतूद केली आहे. मात्र, स्थानिक प्रशासन आणि पालिका पदाधिकाऱ्यांची मंदिर परिक्रमा विकास करण्यासाठी अनास्था असल्याचे चित्र आहे. यातच एका नगरसेवकाचेही अतिक्रमण असल्याने कारवाई केली जात नाही. मंदिर परिसरात पेढे विक्रेते, तसेच अनधिकृत स्टॉलधारक बसले आहेत.

आदेश देऊनही कारवाई नाही...
अतिक्रमणाबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाकडून खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांना दिला होता. मात्र, आदेश दिल्यापासून महिन्याभरात कोणतीही कार्यवाही प्रांत कार्यालयाकडून झाली नाही. यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे आळंदी मंदिर परिसर बकाल झाल्याची टीका संदीप कायस्थ यांनी केली.

Web Title: Alandi Encroachment Additional Commissioner Complaint