ठेकेदार बदलूनही आळंदीत कचऱ्याची समस्या तशीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

आळंदी पालिकेने स्वच्छ शहर स्पर्धेत भाग घेतला. मात्र, शहरातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने नागरिक आणि पदाधिकारी दोघेही पालिका प्रशासन आणि ठेकेदारावर नाराज आहेत. पदाधिकाऱ्यांचे ठेकेदार ऐकत नाहीत आणि प्रशासन ठेकेदारावर कारवाई करत नसल्याने जेमतेम महिन्यापूर्वी नेमलेला ठेकेदारही यापूर्वीच्या ठेकेदाराप्रमाणेच मुजोर झाला आहे.

आळंदी (पुणे) : आळंदी पालिकेने स्वच्छ शहर स्पर्धेत भाग घेतला. मात्र, शहरातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने नागरिक आणि पदाधिकारी दोघेही पालिका प्रशासन आणि ठेकेदारावर नाराज आहेत. पदाधिकाऱ्यांचे ठेकेदार ऐकत नाहीत आणि प्रशासन ठेकेदारावर कारवाई करत नसल्याने जेमतेम महिन्यापूर्वी नेमलेला ठेकेदारही यापूर्वीच्या ठेकेदाराप्रमाणेच मुजोर झाला आहे.

आळंदी पालिकेत घनकचरा व्यवस्थापन ही गेल्या दहा वर्षांत पालिकेसमोरील मोठी समस्या आहे. शहरातील कचरा वेळेत उचलला जात नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून कचरा संकलनासाठी घंटागाड्या व डस्टबिन आणल्या. मागील दोन वर्षांत ठेकेदाराने नीट काम केले नाही म्हणून यावर्षी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नवा ठेकेदार नेमला. नेमलेला नवा ठेकेदारही गेल्या महिन्याभरात स्वच्छता करत नसल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील कचरा जागोजागी साचलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी औषध फवारणी, जंतुनाशक फवारणी केली जात नाही. यामुळे शहरात मच्छरांचे प्रमाणही वाढले.

अस्वच्छतेबाबत पालिका पदाधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी तक्रारी करूनही ठेकेदार दाद देत नाही. याबाबत नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी सांगितले की, सध्याचा ठेकेदार महिन्याभरात शहरातच काय, पालिकेतही दिसला नाही. शहर स्वच्छतेबाबत प्रश्न सांगितले तर समाधानकारक उत्तरे देत नाही. येत्या पंधरा दिवसांत ठेकेदारामध्ये स्वच्छतेबाबत सुधारणा झाली नाही तर याही ठेकेदाराला बदलले जाईल.

दरम्यान, शहरात सध्या मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. गोपाळपुरा, इंद्रायणीनगर, भागीरथी नाला, मरकळ रस्ता, दत्त मंदिर भागात औषध फवारणी आणि धुरळणी यंत्राद्वारे मच्छरांचा बंदोबस्त केला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alandi Garbage Condition