आळंदीत आजपासून कार्तिकी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरवात होईल. कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत हा सोहळा चालणार आहे. कार्तिकी एकादशी सोमवारी (ता.३ ), माउलींचा संजीवन समाधी सोहळा बुधवारी (ता. ५) असणार आहे.

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस शुक्रवारी (ता. ३०) गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सुरवात होईल. कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत हा सोहळा चालणार आहे. कार्तिकी एकादशी सोमवारी (ता.३ ), माउलींचा संजीवन समाधी सोहळा बुधवारी (ता. ५) असणार आहे.

उद्या पहाटे पवमान अभिषेक, दुधारती झाल्यानंतर भाविकांकडून महापूजा होतील. त्यानंतर सकाळी सात ते नऊ या वेळेत देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्यास प्रारंभ होईल. पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे या वेळी उपस्थित राहणार आहेत. 

वीणामंडपात सायंकाळी साडेसहाला योगीराज ठाकूर यांच्या वतीने मानाचे कीर्तन होईल. बाबासाहेब आजरेकर यांच्या वतीने रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तनसेवा होईल. हैबतबाबांच्या पायरीपुढे रात्री दहा ते बारा वासकर महाराजांच्या वतीने त्यानंतर बारा ते दोन मारुतीबुवा कराडकर आणि दोननंतर आरफळकरांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल. कार्तिकी वद्य नवमी आणि दशमीला पवमान पूजा आणि कीर्तनाचे कार्यक्रम होतील. 

मुख्य कार्तिकी एकादशीचा सोहळा सोमवारी (ता. ३) असून, पहाटपूजा मध्यरात्री बारानंतर सुरू होईल. दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि प्रदक्षिणेनंतर सायंकाळी पुन्हा मंदिरात येईल. प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मंगळवारी द्वादशीला माउलींच्या समाधीवर शासकीय महापूजा होईल. दुपारी चारनंतर माउलीचा चांदीचा मुखवटा रथात ठेवून रथोत्सव साजरा केला जाणार आहे. बुधवारी (ता. ५) पहाटे दोन ते अडीच या वेळेत प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे यांच्या हस्ते महापूजा होईल. साडेअकरापर्यंत भाविकांच्या व नामदेव महाराजांच्या वंशजांच्या हस्ते महापूजा होईल. सकाळी सात ते नऊ हैबतबाबांच्या पायरीपुढे आणि साडेसात ते साडेनऊ वीणामंडपात कीर्तन सेवा होईल. त्यानंतर मुख्य समाधी सोहळ्यास सुरवात होईल. या वेळी सकाळी दहा ते बारा या वेळेत वीणामंडपात माउलींच्या संजीवन समाधी दिनावर नामदास महाराजांचे कीर्तन होईल. हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षिणा आणि घंटानाद झाल्यावर महानैवेद्य होईल. त्यानंतर मान्यवरांना नारळ प्रसाद दिला जाईल.

Web Title: Alandi Kartik Wari