अलंकापुरीत आज कार्तिकी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

आळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये,
ज्ञानाचे प्रतिबिंब पडे,
ज्ञानभक्तीने तुझिया चरणी, 
वारकऱ्यांचा जीव जडे...
असे म्हणत आळंदीतील कार्तिकी वारीचा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी (ता. २) आळंदीत दाखल झाला. दरम्यान पहाटे माउलींच्या समाधीवर पवमानपूजा झाल्यानंतर सोमवारी (ता. ३) कार्तिकी एकादशीचा मुख्य कार्यक्रम असून दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याबाहेर निघणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदा वारकऱ्यांची संख्या कमी आहे. दुष्काळाचे सावट असल्याने गर्दी कमी झाल्याची चर्चा वारकऱ्यांमध्ये आहे.

आळंदी - इंद्रायणीच्या पाण्यामध्ये,
ज्ञानाचे प्रतिबिंब पडे,
ज्ञानभक्तीने तुझिया चरणी, 
वारकऱ्यांचा जीव जडे...
असे म्हणत आळंदीतील कार्तिकी वारीचा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा रविवारी (ता. २) आळंदीत दाखल झाला. दरम्यान पहाटे माउलींच्या समाधीवर पवमानपूजा झाल्यानंतर सोमवारी (ता. ३) कार्तिकी एकादशीचा मुख्य कार्यक्रम असून दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याबाहेर निघणार आहे. दरवर्षीपेक्षा यंदा वारकऱ्यांची संख्या कमी आहे. दुष्काळाचे सावट असल्याने गर्दी कमी झाल्याची चर्चा वारकऱ्यांमध्ये आहे.

आळंदीत कार्तिक वद्य अष्टमीपासून माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरवात झाली. तेव्हापासून आळंदीत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. शहरातील प्रदक्षिणा रस्त्याबरोबरच पालिका चौक, चाकण रस्ता, गोपाळपुरा, वडगाव रस्ता, पद्मावती रस्ता, देहू आळंदी रस्ता, नवीन पुलाकडील रस्ता वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेला.

महाद्वार तसेच इंद्रायणी तीरावर गर्दी दिसून होती. पहाटेपासून वारकऱ्यांचा ओघ सुरू होता. ठिकठिकाणी माउली-माउलीचा गजर आणि टाळमृदंगाचा नाद ऐकू येत होता. माउलींच्या समाधीसाठीची दर्शनबारीची रांग पूर्ण भरून इंद्रायणीतीरी प्रशस्त दर्शनमंडपात गेली होती. दर्शनबारीतून सात ते आठ तासांपेक्षा अधिक वेळ लागत आहे. यामुळे देऊळवाड्याच्या पश्‍चिम दरवाजातील दर्शनमंडपातून आत प्रवेशताच प्रत्येक भाविकाला देवस्थानच्या वतीने खिचडी वाटप केले जात होते. माउली-माउली नामाचा अखंड गजर देऊळवाडा आणि परिसरात होता. राज्यभरातून कोकण, सोलापूर, खानदेश, मराठवाडा भागांतून दिंड्यांचा ओघ सुरूच होता. शहरातील प्रमुख रस्ते दिंड्यांनी फुलून गेले होते. तुलनेत प्रदक्षिणा रस्त्यावर गर्दी कमी होती. राहुट्या आणि मंडपातून भजन कीर्तन सुरू होते. खासगी गाड्या तसेच एसटी महामंडळ, पीएमपीने वारकऱ्यांची असंख्य पावले आळंदीच्या दिशेने पडत होती. मंदिरापुढे नारळ फोडण्यास पोलिसांनी बंदी केली. 

दरम्यान आळंदीतील मंदिर परिसर, झाडी बाजार, चाकण रस्ता, देहूफाटा दुकानांमुळे सजला होता. ठिकठिकाणी प्रसादाची दुकाने थाटली होती. आळंदी पालिकेने यंदाच्या वर्षी प्रदक्षिणा रस्ता, महाद्वार रस्ता, शनी मंदिर रस्ता, भराव रस्ता चावडी चौकातून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण कारवाई वारंवार केल्याने रस्ता मोठा झाला.

आजचे मुख्य कार्यक्रम
 दुपारी बारा ते साडेबारा - महानैवेद्य.
 दुपारी एक - माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर.
 रात्री साडे आठ - पालखीचे मंदिरात आगमन व धुपारती.
 रात्री बारा ते चार - मोझे यांच्या वतीने जागर.

पांडुरंगाच्या पादुका दर्शनासाठी गर्दी...
पंढरपूर देवस्थानच्या श्री विठ्ठल मंदिरे देवस्थानच्या वतीने पंढरपूरहून आलेल्या पांडुरंगाच्या पादुका आळंदीत इंद्रायणी तीरी वासकर महाराजांच्या फडावर आहेत. याठिकाणी दर्शनासाठी गर्दी होत आहे. सकाळी इंद्रायणी स्नानासाठी पादुका नगरप्रदक्षिणा करून इंद्रायणी तीरी नेण्यात आल्या. या वेळी पांडुरंगाच्या पादुकांना वासकर कुटुंबीयांनी विधिवत स्नान घातले.

Web Title: alandi Kartik Wari