प्रदक्षिणा रस्ता, इंद्रायणीकाठ उजळणार

आळंदी (ता. खेड) - इंद्रायणी नदीवर पुलाला बसविलेली संरक्षक जाळी.
आळंदी (ता. खेड) - इंद्रायणी नदीवर पुलाला बसविलेली संरक्षक जाळी.

आळंदी - कार्तिकी वारीच्या पार्श्‍वभूमीवर आळंदी शहरातील प्रदक्षिणा रस्त्यांसह विविध रस्त्यांवर सुमारे पावणेदोन कोटींतून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पहाटे चार ते रात्री दहा या वेळेत विभागवार पिण्याचे पाणी पुरविणार असल्याची माहिती आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.

कार्तिकी वारी सुरू होण्यापूर्वीच इंद्रायणी नदीवरील पुलांवर तीस लाख रुपये खर्चून संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू आहे. वडगाव रस्त्यावर एक कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. प्रदक्षिणा रस्त्यांसह इंद्रायणी नदीकाठ, चाकण रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्त्यावरही पथदिवे बसविले जातील. यासाठी पावणेदोन कोटी खर्चाची तरतूद आहे. यामुळे यात्राकाळात प्रदक्षिणा रस्त्यांसह नदीकाठ उजळणार आहे. 

वारीकाळात साथरोगांचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये, यासाठी शौचालयांच्या परिसरात औषधफवारणी आणि जनजागृती केली जाईल. स्वच्छतेसाठी जादाचे १२० कर्मचारी नेमले आहेत. रस्ते झाडण्यासाठी दोन सत्रांत, तर कचरा उचलण्यासाठी तीन सत्रांत कर्मचाऱ्यांची विभागवार रचना केली आहे.

धर्मशाळांतील कचरा उचलण्यासाठी सहा स्वतंत्र घंटागाड्या तैनात केल्या आहेत. शहरातील घनकचरा प्रदूषण टाळण्यासाठी वारकऱ्यांनी ओला-सुका कचरा वेगळा करून स्वतंत्र बॅरेलमध्ये जमा करावा. पालिकेची घंटागाडी नंतर कचरा गोळा करेल, अशा सूचना धर्मशाळा आणि राहुट्यांना दिल्या आहेत. 

शहरात प्लॅस्टिकबंदी असल्याने चहाचे कप, थर्माकोलच्या पत्रावळीविक्रीवर बंदी असून, प्लॅस्टिक वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पालिकेच्या वतीने तीनशे आणि देवस्थानच्या वतीने  शंभर फिरती शौचालये उपलब्ध आहेत. पालिकेच्या मालकीची ६१ फिरती शौचालये आणि तीर्थक्षेत्रात विकास निधीतून उभारलेले सुमारे पाचशे सिट्‌सचे शौचालय वारकऱ्यांच्या सोयीसाठी आहेत. शौचालयांचे तुटलेले दरवाजे, नळ, विद्युतजोड नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com