
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील प्रदक्षिणा रस्त्यांसह विविध रस्त्यांवर युद्धपातळीवर सुमारे पावणेदोन कोटी रुपयांतून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पहाटे चार ते रात्री दहा या वेळेत विभागवार पिण्याचे पाणी पुरविणार असल्याची माहिती आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.
आळंदी (पुणे) : कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील प्रदक्षिणा रस्त्यांसह विविध रस्त्यांवर युद्धपातळीवर सुमारे पावणेदोन कोटी रुपयांतून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पहाटे चार ते रात्री दहा या वेळेत विभागवार पिण्याचे पाणी पुरविणार असल्याची माहिती आळंदी पालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.
कार्तिकी वारी सुरू होण्यापूर्वीच इंद्रायणी नदीवरील पुलांवर तीस लाख रुपये खर्चून संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू आहे. वडगाव रस्त्यावर एक कोटी रुपये खर्चून रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले जात आहे. प्रदक्षिणा रस्त्यांसह इंद्रायणी नदीकाठ, चाकण रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्त्यावरही पथदिवे बसविले जातील. यासाठी पावणेदोन कोटी खर्चाची तरतूद आहे. यामुळे यात्राकाळात प्रदक्षिणा रस्त्यांसह नदीकाठ उजळणार आहे.
वारीकाळात साथरोगांचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये, यासाठी शौचालयांच्या परिसरात औषधफवारणी आणि जनजागृती केली जाईल. स्वच्छतेसाठी जादाचे 120 कर्मचारी नेमले आहेत. रस्ते झाडण्यासाठी दोन सत्रांत, तर कचरा उचलण्यासाठी तीन सत्रांत कर्मचाऱ्यांची विभागवार रचना केली आहे. धर्मशाळांतील कचरा उचलण्यासाठी सहा स्वतंत्र घंटागाड्या तैनात केल्या आहेत. शहरातील घनकचरा प्रदूषण टाळण्यासाठी वारकऱ्यांनी ओला-सुका कचरा वेगळा करून स्वतंत्र बॅरेलमध्ये जमा करावा. पालिकेची घंटागाडी नंतर कचरा गोळा करेल, अशा सूचना धर्मशाळा आणि राहुट्यांना दिल्या आहेत.
शहरात प्लॅस्टिकबंदी असल्याने चहाचे कप, थर्माकोलच्या पत्रावळीविक्रीवर बंदी असून, प्लॅस्टिक वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पालिकेच्या वतीने तीनशे आणि देवस्थानच्या वतीने शंभर फिरती शौचालये उपलब्ध आहेत. पालिकेच्या मालकीची 61 फिरती शौचालये आणि तीर्थक्षेत्रात विकास निधीतून उभारलेले सुमारे पाचशे सिट्सचे शौचालय वारकऱ्यांच्या सोयीसाठी आहेत. शौचालयांचे तुटलेले दरवाजे, नळ, विद्युतजोड नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे.
वारीकाळात मागील काही वर्षे रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जाईल. यामुळे मध्यरात्रीच्या वेळी वारकऱ्यांना पाण्यासाठी जागे राहावे लागत. यंदा पहाटे चारपासून रात्री दहापर्यंत पाणीपुरवठा विभागवार केला जाईल. याशिवाय देहूफाटा परिसरात पिंपरी महापालिकेच्या वतीने यात्राकाळात दररोज दहा लाख लिटर पाणीपुरवठा पिण्यासाठी केला जाईल. राहुट्यांना पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र टॅंकरची व्यवस्था केली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून चाकण चौक, नवीन एसटी स्थानकात सुलभ शौचालये बांधली असून, त्या ठिकाणी शुल्क आकारले जाते. यात्राकाळात जादा पैसे वारकऱ्यांकडून घेतले जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. किमान वारीकाळात सुलभ शौचालये मोफत ठेवली जावीत, अशी मागणी पालिका आणि वारकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
मोठ्या रस्त्यांवर अथवा मंदिर परिसरातील रस्त्यास अडथळा ठरणारे दुकानांचे अतिक्रमण, बेकायदा शेड बांधकामांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण पथक तयार केले असून, सोमवारपासून (ता. 18) कारवाईस सुरुवात होईल. स्वतःहून दुकानदारांनी अतिक्रमणे काढून घेण्याबाबत यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. जे अतिक्रमण काढून घेणार नाहीत, त्यांच्यावर पोलिस बंदोबस्तात कारवाई केली जाईल. भिकारी तसेच पथारीवाल्यांना बंदी आहे. पदपथावर कोणत्याही प्रकारच्या विक्रेत्यांना दुकान थाटण्यास बंदी असल्याची माहिती नगराध्यक्षा उमरगेकर यांनी दिली.
नगरपालिकेकडून सोईसुविधा