आळंदीत मंगळवारपासून वाहतुकीत बदल

Vahtuk123
Vahtuk123

आळंदी (पुणे) : कार्तिकी वारीमुळे मंगळवारपासून (ता. 19) आळंदीला औद्योगिक भागातून येणारी अवजड आणि चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. मरकळ औद्योगिक भागात जाणारी अवजड वाहतूक पुणे-आळंदीमार्गे न नेता पुणे-नगर महामार्गावरून वाघोली लोणीकंदमार्गे वळविली जाईल. तर चाकण, भोसरी, चिंबळी, शेलपिंपळगाव भागातून येणारी अवजड वाहनांना आळंदीकडे मार्ग बंद राहील. वारी काळात शहरातील धर्मशाळांपुढे रस्त्यावर वाहने उभे करण्यास बंदी राहणार असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.

घातपात अथवा चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी संशयास्पद व्यक्तींवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाईल. शहरात यंदाच्या वर्षी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. यामध्ये सात सहायक पोलिस आयुक्त, तीस पोलिस निरीक्षक, एकशे बत्तीस सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, एक हजार पुरुष आणि अडीचशे महिला पोलिस, साडेचारशे होमगार्ड असा आळंदी पोलिसांचा बंदोबस्त कार्तिकी वारीसाठी वरिष्ठांकडे मागणी केली. संपूर्ण पोलिसांची दहा गटात विभागणी केली जाणार असून दोन सत्रात बंदोबस्त राहील. इंद्रायणी नदी परिसर, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपुरा, चाकण चौकातील भुरट्या चोऱ्या आणि पाकिटमारीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात येणार आहे.

महिलांच्या छेडछाड रोखण्यासाठी महिला बीट मार्शलची नेमणूक करण्यात येणार असून महिला बिट मार्शल राहुट्यांमधून आणि धर्मशाळांमधून महिला भाविकांची छेडछाड होऊ नये यासाठी लक्ष ठेवतील. मंदिर आणि मंदिर परिसरात शंभर पोलिसांचा बंदोबस्त तर महाद्वार, पंखा मंडपात महिला पोलिसांची नेमणूक केली जाईल. इंद्रायणी काठी आणि शहरातील प्रमुख चौकात संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी स्वतंत्र पोलिसांची नेमणूक केली जाईल. शहरात सीसीटीव्ही यंत्रणेसाठी सव्वाशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. मंदिराच्या पानदरवाजातून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल. दर्शन झाल्यानंतर भाविकांनी महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे.

महाद्वारातून केवळ पोलिस, महसूल कर्मचारी, देवस्थानचे मानकरी, पुजारी, पत्रकार अशा फोटोपास धारकांनाच प्रवेश दिला जाईल. हरिहरेंद्र स्वामी मठाशेजारील दरवाजातून फडकरी, दिंडीकरी आणि निमंत्रित पासधारकांना प्रवेश दिला जाईल. हनुमान दरवाजातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. दोनशे वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली आहे. अवजड वाहने तसेच ट्रकसारख्या चारचाकी वाहनांसाठी शहराच्या बाहेर पार्किंगची सुविधा केली आहे.

हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पब्लिक ऍड्रेस सिस्टम आहे. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शहरात सहा ठिकाणी सीसीटीव्ही उभारले जातील. अत्यावश्‍यक सुविधा पुरविणारी रुग्णवाहिका, दुधविक्रेते यांना शहरात प्रवेश राहील. यात्रा काळात अवैध धंद्यावर कारवाई केली जाईल. यात्रा काळात परमीटची मद्यविक्रीही बंद ठेवली जाणार आहे. सोमवारपर्यंत (ता. 18) पोलिस बंदोबस्त रुजू झाल्यावर रंगीत तालीम केली जाणार आहे.

अशा आहेत उपाययोजना

  • नदीकाठी तसेच प्रदक्षिणा मार्गावर छेडछाड रोखण्यासाठी महिला बिट मार्शल
  • प्रदक्षिणा रस्ता आणि मंदिराकडे येणाऱ्या मार्गांवर वाहनांना बंदी
  • शहराबाहेर चारचाकी वाहनांसाठी पार्किंग
  • हनुमान दरवाजातून व्हिआयपींना प्रवेश
  • महाद्वारातून फोटोपासधारकांना प्रवेश
  • शहरात प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही
  • अतिक्रमण कारवाईसाठी स्वतंत्र पोलिस पथक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com