प्लॅस्टिकबंदीचा वारकऱ्यांमध्ये संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

आळंदी - आषाढी पालखी सोहळा दहा-बारा दिवसांवर आलेला आहे. सरकारच्या प्लॅस्टिकबंदी धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे वारकरी व दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

आळंदी - आषाढी पालखी सोहळा दहा-बारा दिवसांवर आलेला आहे. सरकारच्या प्लॅस्टिकबंदी धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे वारकरी व दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

तीन महिन्यांपासून वारीची तयारी करणाऱ्या पालखी सोहळ्यातील दिंडी चालक-मालकांसह मोफत वस्तू आणि खाद्यपदार्थ वाटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची बहुतांश खरेदी पूर्ण झाली. मात्र, प्लॅस्टिकबंदीमुळे प्लॅस्टिकचा कागद, जेवणाच्या पत्रावळी आणि कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराबाबतचा संभ्रम वारकऱ्यांमध्ये कायम आहे. वारीत जेवणासाठी अनेक जण थर्माकोलच्या पत्रावळी वापरतात. झोपताना जमिनीवर अंथरण्यासाठी अनेक जण प्लॅस्टिक, तसेच पावसापासून संरक्षणासाठी मेणकापड वापरतात. अनेक स्वयंसेवी संस्था वारकऱ्यांना हे प्लॅस्टिकचे कागद मोफत वाटतात. 

आळंदी व देहूसारख्या मोठ्या गावांतील दुकानदारांनी प्रसादासाठीचे मुरमुरे, बत्तासे, साखरफुटाणे, गंध, बुक्का, प्लॅस्टिकच्या खेळण्याची खरेदी केली आहे. धूळ आणि पावसापासून खेळण्याचे संरक्षण व्हावे, यासाठी अगोदरच खेळण्यांना प्लॅस्टिकचे आवरण असते. आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खेळणी प्लॅस्टिकमुक्त करा नाही तर जप्त होतील, असे सांगितले. यामुळे दुकानदारांवर ऐन वारीत प्रसाद आणि खेळणी विकण्यावर प्लॅस्टिकबंदीचे सावट आले आहे. चोपदार फाउंडेशन आणि काही संस्था निर्मलवारी म्हणून पालखी तळाची स्वच्छता राखण्यासाठी दिंड्यांना कचरा आणि शिल्लक अन्न गोळा करण्यासाठी दहा किलोच्या मोठ्या प्लॅस्टिक बॅग देत असतात. त्यानंतर स्थानिक पातळीवर पालिका किंवा ग्रामपंचायत हा गोळा झालेला कचरा घंटागाडीने वाहून नेतात. मात्र, प्लॅस्टिक बॅगलाच बंदी असल्याने वारीतील दिंड्यांनी पालखी तळावर कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत प्रशासनाकडून तयारी नाही आणि सूचनाही नाही. 

वारी काळात खाद्यपदार्थ, तसेच बिस्कीट, गुडदाणी, शेंगदाणा लाडू, खजूरसारख्या खाद्यपदार्थ वाटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची लक्षणीय संख्या आहे. मात्र, आता या संस्थांनाही प्लॅस्टिक बंदीमुळे काळजी घ्यावी लागणार आले. वारीच्या वाटेवर चहा विक्रेते आजपर्यंत प्लॅस्टिकच्या कपाचा सर्रास वापर करत. आता मात्र या विक्रेत्यांनाही कागदी कपाचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. 

वारीत दिंड्यांतील वारकऱ्यांना जेवणासाठी थर्माकोलची पत्रावळ वापरण्यास बंदी असल्याने आळंदी देवस्थान प्रत्येक दिंडीला एक हजार कागदी, पानाच्या पत्रावळीचे वाटप करणार आहे. माउलींच्या सोहळ्यात चारशे दिंड्या असल्याने सुमारे चार लाख कागदी, पानाच्या पत्रावळी मोफत देणार आहेत. तळाच्या स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. पावसाळ्यात अंगावर घेण्यात येणाऱ्या मेणकापडाबाबत सरकारचे धोरण शिथिल करण्याबाबत देवस्थानच्या वतीने विनंती करणार आहे.
-ॲड. विकास ढगे, पालखी सोहळा प्रमुख, आळंदी देवस्थान

Web Title: Alandi news Confusion in Warakari for plasticBan