आळंदीत एकेरी वाहतुकीमुळे कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

आळंदी - प्रदक्षिणा रस्त्याचे विकासकाम सुरू असल्याने शहरात एकेरी वाहतुकीचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आला. मात्र, एकेरी वाहतूक धोरण राबविण्याऐवजी चाकण रस्त्यावरून येताना घुंडरे गल्लीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेट लावून रस्ता बंद केला आहे. त्यातून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. अवजड वाहतूक बंद करण्याऐवजी पोलिसांनी बॅरिगेट लावल्यामुळे छोट्या वाहनांचीही वाट बिकट झाली आहे.

राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सध्या आळंदीतील प्रदक्षिणा रस्त्याचे विकासकाम सुरू आहे. सिमेंटीकरण केले जात असल्याने रस्त्याचे काम सुमारे दोन महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एकेरी वाहतुकीचा आदेश काढला. त्यानुसार पोलिसांनी चाकण रस्ता ते भैराव मंदिर चौकदरम्यान एकेरी वाहतूक सुरू ठेवली. मात्र, तरीही बेशिस्त वाहनचालक रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक करत आहेत. याशिवाय गेल्या आठवडाभरापासून चाकण रस्त्यावरून येताना घुंडरे गल्लीत प्रवेश करताना पोलिसांनी लोखंडी बॅरिगेट लावली. त्यामुळे वाहनचालक व आळंदीकरांमध्ये नाराजी आहे. वास्तविक या रस्ता पालिकेच्या हद्दीत येतो. या रस्त्यावरून चाकण, चिंबळी, केळगाव भागातून अनेक वाहने येत असतात. शिक्रापूर, मरकळ औद्योगिक भागात जाणाऱ्या कामगारांची वाहने व इतर छोट्या मोठ्या वाहनचालकांना आता वाहने नवीन पुलावरून देहू फाटामार्गे पालिका चौकातून वळसा मारून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीही होत आहे. घुंडरे गल्लीतील बॅरिगेट काढण्याची मागणी आळंदीकरांतून होत आहे. याबाबत पालिकेत विचारणा केली असता, याबद्दल काही माहीत नसल्याचे सांगण्यात आले. तर, अवजड वाहने येऊ नयेत म्हणून बॅरिगेट लावल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.

शहराबाहेरच अवजड वाहने रोखा
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकेरी वाहतुकीचा आदेश काढताना अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, आजही अवजड वाहतूक सुरूच आहे. वास्तविक लोणीकंद फाटा, चिंबळी फाटा, चाकण फाटा या ठिकाणीच अवजड वाहतूक रोखल्यास आळंदी शहरात अवजड वाहने येणार नाहीत. मात्र, पोलिस ही वाहने आळंदीत येण्याची वाट पाहत बसले आणि शहरातील रस्ते बंद ठेवले. त्यामुळे इतर वाहतुकीला त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय पालिका चौक आणि प्रदक्षिणा रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी असतात. मात्र, पोलिस अभावानेच कारवाई करत असतात. उभ्या वाहनांमुळेही वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Alandi One Way Route Traffic Issue