आळंदीत वीज, पाणी गायब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

आळंदी शहरात गेली दोन दिवस वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंगची प्रक्रिया बंद होती. शनिवारी दुपारनंतर पंपिंग सुरू करण्यात आली आहे. 
- वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्ष 

आळंदी : वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे आळंदीकर हैराण झाले आहेत. खंडित वीजपुरवठ्यामुळे पालिकेमार्फत होणारा पाणीपुरवठाही गेल्या दोन दिवसांपासून बंद झाल्याने पाण्यावाचून नागरिक आणि भाविकांचे हाल झाले. धर्मशाळांना तर टॅंकरचे पाणी वापरावे लागत आहे. 

आळंदीत महिनाभरात दिवसाकाठी पाचहून अधिक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. शुक्रवारी दिवसभरात वीजपुरवठा खंडित झालाच. मात्र रात्री बारानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सकाळी सातनंतरही सुरू झाला नव्हता. खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक आणि भाविकांचे हाल झाले. शनिवारी सकाळपासून रात्रीपर्यंत दहा ते बारा वेळा शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, पालिकेच्या जलशुद्धीकरण यंत्रणाही बंद झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्‍या रिकाम्याच राहिल्या. जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग बंद झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहर पाण्यावाचून वंचित राहिले. सध्या धर्मशाळांमधून अधिकमासानिमित्त हरिनाम सप्ताह सुरू आहे. बाहेरून आलेल्या भाविकांची पंचायत झाली. 

खंडित वीजपुरवठ्याबाबत विचारणा करण्यासाठी आळंदी विकास मंचचे कार्यकर्ते संदीप नाईकरे, संदीप कुलकर्णी, शिवाजी पाटणकर, प्रसाद बोराटे, मयूर जोशी, बाबू मोरे यांनी स्थानिक वीज मंडळाला भेट दिली असता, तेथे कोणीच कर्मचारी नव्हते. तर, कार्यालयातील दूरध्वनी यंत्रणाही बंद असल्याने वीज मंडळाबाबत स्थानिक नागरिकांचा उद्रेक आहे. 

येत्या दोन आठवड्यांत विजेच्या समस्यांवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा केंद्रासाठी स्वतंत्रपणे यात्रा अनुदानातून जनसेट घेण्यात येत आहे. यामुळे पंपिंगला अडचण येणार नाही. 
- समीर भूमकर, मुख्याधिकारी 

पहाटेपर्यंत कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करत होते. यामुळे कार्यालयात येण्यासाठी कर्मचाऱ्यांना उशीर झाला. 
- एस. एल. ढापसे, कनिष्ठ अभियंता 

Web Title: In Alandi power and water gone