...पोलिस वेळेत पोचले नसते तर!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

पुणे : "साहेब एक माणूस हातात पिस्तूल घेऊन लोकांना धमकावतोय. त्यामुळे घाबरून लोकांची धावपळ उडाली आहे.' अशी माहिती एका सजग नागरिकाने रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली, तर समोर सराईत गुन्हेगार हातात पिस्तूल घेऊन लोकांना धमकावत असल्याचे चित्र समोर दिसले. स्वतःच्या जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्यास पकडले आणि लोकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला ! 

सजग नागरिक व सतर्क पोलिसांच्या या कामगिरीमुळे केवळ एक सराईत गुन्हेगारच पकडला नाही, तर एक मोठी दुर्घटनाही थांबविण्यास मदत केली आहे. बुधवारी रात्री पावणे दहा वाजता दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलिस कर्मचारी महेश गाढवे, तानाजी निकम, सुधीर घोटकुले, रोहन खैरे, सागर सुतार व शिवाजी क्षीरसागर हे रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी दत्तवाडी परिसरातील बाल शिवाजी चौकामध्ये एक व्यक्ती पिस्तूल घेऊन ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावीत आहेत. तसेच त्यास घाबरून लोकांची धावपळ सुरू असल्याचे एका नागरिकाने पोलिसांना सांगितले. 

बाल शिवाजी चौक सतत वर्दळीने गजबजलेला असल्यामुळे आणि तेथे पिस्तुलधारी व्यक्ती खुलेआम फिरत असल्याची खबर ऐकून क्षणभर पोलिसांच्याही तोंडचे पाणी पळाले. मात्र तत्काळ पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले. तर समोर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जुबेर जाफर शेख (वय 23, रा. श्रीकृष्ण मित्रमंडळाजवळ, दत्तवाडी) हा हातात पिस्तूल घेऊन पादचाऱ्यांना धमकावत असल्याचे निदर्शनास आले.

शेखच्या पिस्तुलातून सुटलेली एखादी गोळी सर्वसामान्य नागरिकाचा जीव घेऊ शकते, या विचार मनात घेऊन पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याच्या मुसक्‍या आवळल्या आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल व मॅगझीनमध्ये असलेली दोन जिवंत काडतुसे असा 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

Web Title: Alert Pune Police rushed to arrest criminal