शेतकरी म्हणतात,  पावसानं हिरवं सोनं सडवून टाकलं !

विजय मोरे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

खरीप हातचा गेला, म्हणून कांद्यावर भिस्त ठेवलेल्या शेतकऱ्यांची सारी स्वप्ने सतत पडणाऱ्या पावसाने उध्वस्त झाली आहेत. 

उंडवडी (पुणे) : ""सलग तीन वर्षांचा दुष्काळ सरला आणि कांदा नशीब काढेल म्हणून सगळी स्वप्ने कांद्याच्या रोपांमधून शेतात पेरली; पण ज्यानं घरात लक्ष्मी आणावी, त्या पावसानं हिरवं सोन सडवून टाकलं. कांदा आज शेतात नासलाय आणि आमची स्वप्ने पार करपून गेली...'' अशी व्यथा उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील चंद्रकांत बापूराव गवळी यांनी व्यक्त केली.

गवळी यांची ही व्यथा प्रातिनिधीक आहे, कारण हेच भयानक चित्र सध्या जिरायती भागात आहे. पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कुणाकडे मागायची, अशा अर्थाची म्हण सध्या बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात सगळीकडे रुढ होताना दिसतेय; कारण सरकारी चुकीच्या धोरणांनी पिचलेले शेतकरी सुल्तानी संकटाचा सामना करतानाच गेल्या काही दिवसांपासूनच्या अस्मानी संकटांनी त्यांना घेरले आहे. खरीप हातचा गेला, म्हणून कांद्यावर भिस्त ठेवलेल्या शेतकऱ्यांची सारी स्वप्ने सतत पडणाऱ्या पावसाने उध्वस्त झाली आहेत. ज्या पाण्यासाठी उन्हाळ्यात टाहो फोडला, ते पाणी प्रचंड नुकसान करताना बघून डोळ्यात पाणी येत असल्याची प्रतिक्रिया गवळी यांनी व्यक्त केली. 

गवळी यांची गावात वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. गेली तीन वर्षे या शेतीतून काही उत्पन्न मिळालेले नाही. जुलैमध्ये कांदा, मका व गुलछडी त्यांनी लावली. तीनही पिकांवर त्यांनी दीड लाखापर्यंत खर्च केला. खरेतर जणू त्यांनी या पिकांवर पैसा लावला होता, मात्र तो जुगार काही दिवसांतच ते हरले. पावसाने गुलछडीचे कंदही कोमेजून गेले. मका व कांदा आता उरलेला नाही. आता काय खायचे आणि झालेल्या खर्चाची कशी भर काढायची, या विंवचनेत गवळी आहेत. 

अद्यापही पंचनामे नाहीत 
उंडवडी सुपे परिसरात पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. मात्र अद्यापही शासनाकडून पिकांच्या पंचनाम्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All the dreams of the farmers were destroyed by the rain