पुरे महाराष्ट्रामे मुझे गुलाबजामही खाने मिले...!

गणेश बोरुडे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

तळेगाव स्टेशन - "प्रमोदने लोगो को बताया की, अटलजी को गुलाबजाम पसंद है. तो जहा भी गया पुरे महाराष्ट्रामे मुझे गुलाबजामही खाने मिले", असे मिस्कील शब्दातील उद्गार दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विष्णूभाई शहा यांच्या ताळेगावातील घरी भोजनप्रसंगी काढले होते.

तळेगाव स्टेशन - "प्रमोदने लोगो को बताया की, अटलजी को गुलाबजाम पसंद है. तो जहा भी गया पुरे महाराष्ट्रामे मुझे गुलाबजामही खाने मिले", असे मिस्कील शब्दातील उद्गार दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विष्णूभाई शहा यांच्या ताळेगावातील घरी भोजनप्रसंगी काढले होते.

तळेगाव दाभाडे शहर म्हणजे जनसंघाचा पूर्वापार बालेकिल्ला. अटलजी जवळपास तीन वेळा तळेगाव दाभाडेला येऊन गेले. सन १९७२ च्या फेब्रुवारी महिन्यात तळेगाव दाभाडे येथे भारतीय जनसंघाचे तीन दिवसीय प्रांत अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. रामभाऊ म्हाळगी यांनी प्रमोद महाजन यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी दिली होती. त्यांतर्गत अधिवेशनाच्या समारोपाला आलेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सायंभोजनाची व्यवस्था संघसंकेतानुसार तत्कालीन संघचालक विष्णूभाई शहा यांच्या घरी करण्यात आली होती. 

या संधीने भारावून गेलेलं अख्ख शहा कुटुंब तयारीला लागलं होत. १४ अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या भारतीय बैठकीच्या थाटातील जेवणाचा मेनू आई गोदावरी आणि प्रमोद महाजन यांनी ठरवला होता. भोजनप्रसंगी अटलजींचे आगमन झाल्यावर त्यांनी सर्व कुटुंबियांची आपुलकीने वैयक्तिक चौकशी केली. कुठलीही बडेजाव न करता मनमोकळ्या गप्पा मारल्या. आठवणींना उजाळा देताना अटलजींचा वागण्यातील साधेपणा, सर्वांशी जवळीक साधण्याची किमया, गप्पांच्या ओघात आपसूकच उडणारी हास्याची कारंजे आदि विविध पैलू यानिमित्ताने अनुभवयास मिळाल्याचे सांगताना कै.विष्णूभाई यांचे सुपुत्र दिलीपभाई शहा यांचे डोळे साहजिकच पाणावले. जेवनाअगोदर अटलजींनी गोड पदार्थाबद्दल विचारले असता विष्णूभाईनी दुधाचे पदार्थ बनवल्याचे सांगितले.त्यावर उसासा टाकत अटलजी प्रमोद महाजनांकडे कटाक्ष टाकून बोलले, “प्रमोदने लोगो को बताया कि, अटलजी को गुलाबजाम पसंद है.तो जहा भी गया पुरे महाराष्ट्रामे मुझे गुलाबजामही खाने मिले”. त्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.कै.कुशाभाऊ ठाकरे, सुंदरसिंह भंडारी, कै.रामभाऊ म्हाळगी, कै.वसंतराव पटवर्धन यांच्यासोबतच डॉ. सुब्रमण्यम स्वामी, कृष्णराव भेगडे आदींबरोबर पंक्तीत बसून जेवताना अटलजींनी जेवणाच्या पंक्तीसमोर काढलेल्या रांगोळीचे आणि महाराष्ट्रीय पद्धतीने बनवलेल्या जेवणाचे तोंडभरून कौतुक केले. त्यानंतर १९७८ साली अटलजी परराष्ट्रमंत्री असताना, भेटीचा योग आला होता. आज ४३ वर्षानंतर, जपून ठेवलेल्या फोटोच्या संदर्भाने घरातील त्या जेवनावळीत अटलजी नेमके कुठे बसले होते? ती जागा दाखवत या आठवणींना उजाळा देताना दिलीपभाई भावूक झाले. अटलजी आज आपल्यात नसले तरी, त्यांचे दाद देणारे आपुलकीचे शब्द हीच मोठी ठेव जवळ असल्याचे दिलीपभाई म्हणाले.

Web Title: All the Maharashtra's got me to eat gulab jamahi ...!