आघाडीविरुद्ध भाजप, शिवसेना, मनसेची लढत

आघाडीविरुद्ध भाजप, शिवसेना, मनसेची लढत

पुणे - कोथरूडमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असताना प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर) या भागात गेल्या काही निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपले स्थान भक्कमपणे टिकवून ठेवल्याचे दिसून येते. 

मुख्यत्वे डोंगरउतार व लगतच्या परिसरातील वस्ती भाग ७० टक्के असून, काही गृहनिर्माण संस्था ३० टक्के भागात आहेत. प्रभाग क्रमांक ११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे चार विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या आघाडीविरोधात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार लढत देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर दीपक मानकर आणि नगरसेविका अश्‍विनी जाधव यांचा जुना प्रभाग, तसेच काँग्रेसचे नगरसेवक ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदू कदम आणि नगरसेविका वैशाली मराठे यांचा जुना प्रभाग मिळून हा नवीन प्रभाग क्रमांक ११ बनला आहे. पुण्यात या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रभागातील प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. प्रभागात केलेली विकासकामे सांगत ते प्रचाराला लागले आहेत.

मानकर २००२ मध्ये स्वीकृत नगरसेवक, तर २००७ पासून दहा वर्षे या भागातून नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरची महापालिकेची पोटनिवडणूक मोदी लाट असतानाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवून जिंकली. ‘अ’ गटात मानकर, भाजपचे संतोष अमराळे आणि शिवसेनेचे अनिल घोलप यांच्यात तिरंगी लढत आहे.

भाजपने माजी नगरसेवक दिलीप उंबरकर यांना लढतीत उतरविले आहे. ते २००२ पासून २०१२ पर्यंत या भागातून नगरसेवक होते. गेल्या निवडणुकीत त्यांना पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने ते कदम यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून लढले, तर विधानसभा निवडणुकीनंतर या भागात त्यांनी मानकर यांच्याविरुद्ध पोटनिवडणूक लढविली होती. या भागातून पूर्वी सुबराव कदम तीनवेळा निवडून आले होते. चंदू कदम २००७ पासून स्वीकृत नगरसेवक, तर २०१२ मध्ये महापालिकेवर निवडून आले. ‘ड’ गटात उंबरकर यांची लढत कदम यांच्याशी होत असून, या गटात शिवसेनेचे जयदीप पडवळ, मनसेचे संदीप जोरी यांच्यासह एकूण सात उमेदवार आहेत.

सर्वसाधारण महिलांसाठीच्या ‘ब’ गटात पाच उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका जाधव, भाजपच्या छाया मारणे, शिवसेनेच्या सविता मते आणि मनसेच्या वृषाली धुमाळ या प्रमुख उमेदवार आहेत. ‘क’ गटात सहा उमेदवार आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली मराठे, भाजपच्या मनीषा बुटाला, शिवसेनेच्या शर्मिला शिंदे आणि मनसेच्या स्नेहल शिंदे या प्रमुख उमेदवार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com