युतीबाबत अद्याप अस्पष्टता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

स्वतंत्र लढल्यास 70 हून अधिक जागांच्या मतप्रवाहामुळे भाजप नेते संभ्रमात

स्वतंत्र लढल्यास 70 हून अधिक जागांच्या मतप्रवाहामुळे भाजप नेते संभ्रमात
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही ठोस निर्णयाप्रत आलेले नाही. स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास पक्षाला 70 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकेल, असा मतप्रवाह शहर भाजपमध्ये तयार होऊ लागला आहे, तर शिवसेनेला 20 ते 22 जागा मिळतील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे युती करावी की स्वतंत्र लढावे, अशा संभ्रमात भाजपचे नेते असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.

राज्यातील पिंपरी-चिंचवडसहित दहा महापालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केल्या. पाच दिवस उलटूनही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार किंवा नाही? याबद्दल ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करा, अशा सूचना शहर पदाधिकाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभाव्य युतीबाबत आत्तापर्यंत दोन वेळा सकारात्मक चर्चा झाली आहे.

राज्यभरातील पालिकांच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढवून अधिकाधिक नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही "शतप्रतिशत भाजप'ची चाचपणी केली जात आहे. त्याच दृष्टीने शहर भाजपकडून यापूर्वीच निवडणूकपूर्व सर्वेक्षण करण्यात आला आहे.

पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वेक्षणामधून स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्यास भाजप आणि शिवसेनेला किती जागा मिळतील? याबाबत पक्षाच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेत मौन बाळगले आहे; परंतु शहरात स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्यास 80 ते 82 जागांवर विजय मिळविता येईल, तर शिवसेनेला 20 ते 22 जागा मिळतील, असे भाकितही व्यक्त केले जात आहे.

शिवसेना नेत्यांच्या टीकेमुळे अस्वस्थता
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांकडून भाजप नेत्यांवर कडवट टीका केली जात आहे. त्यामुळे युतीची चर्चा होऊनही शहर भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यामुळे भाजपचे स्थान बळकट झाले आहे. "राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्यामुळे पक्षाला अधिक ताकद मिळाली आहे. या परिस्थितीत समसमान जागावाटपाचा शिवसेना नेत्यांचा प्रस्ताव भाजप पक्षनेते आणि कार्यकर्त्यांना कितपत मान्य होईल, याबद्दलही साशंकता निर्माण झाली आहे.

 

'महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आम्ही सकारात्मक असून, 100 टक्के प्रयत्नशील आहोत.''-
- आमदार लक्ष्मण जगताप, भाजप शहराध्यक्ष
Web Title: alliance confussion in pimpri-chinchwad municipal election