युतीचा निर्णय शुक्रवारी ठरणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

पुणे - महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना- भाजप हे दोन्ही मित्रपक्ष एकत्र येणार का, याचा निर्णय शुक्रवारी (ता. 20) होणाऱ्या बैठकीत होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांबरोबरच दोन्ही कॉंग्रेसचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले आहे. "सन्मानाने जागा दिल्या तरच युती,' या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्यामुळे त्याला भाजप किती दाद देणार यावरच युतीचे भवितव्य ठरणार आहे. 

पुणे - महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेना- भाजप हे दोन्ही मित्रपक्ष एकत्र येणार का, याचा निर्णय शुक्रवारी (ता. 20) होणाऱ्या बैठकीत होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांबरोबरच दोन्ही कॉंग्रेसचे लक्ष या बैठकीकडे लागून राहिले आहे. "सन्मानाने जागा दिल्या तरच युती,' या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्यामुळे त्याला भाजप किती दाद देणार यावरच युतीचे भवितव्य ठरणार आहे. 

महापालिका निवडणुकीतील युतीच्या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची दोन दिवसांपूर्वीच पहिली बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने जागावाटपाबाबत चर्चेपेक्षा युतीसंदर्भात दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये किती गांभीर्य आहे, याचीच चाचपणी झाली. अन्यथा, चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवणे आणि वेळ वाया घालून दोन्ही पक्षांचे नुकसान करून घेण्यात काही अर्थ नाही, अशीच काही भूमिका दोन्हीकडच्या नेत्यांनी या बैठकीत मांडली. युती करावयाची झाली, तर काय सूत्र असावे, याचा विचार करूनच पुढील बैठक घेण्याचे ठरल्याचे सेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. 

त्यानुसार येत्या शुक्रवारी ही बैठक होत आहे. शिवसेनेकडून सत्तर जागांचा आग्रह धरला जाणार आहे, त्यावर तडजोड करून पाच ते दहा टक्के जागा इकडे-तिकडे करण्याची पक्षाची तयारी आहे. जागा किती मिळणार आणि त्या कोणत्या मिळणार, यावर आमचा भर राहणार आहे. ते मान्य असेल, तरच युतीसंदर्भात पुढील बोलणी होऊ शकते, अशी शिवसेनेची भूमिका राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजपही त्याचदृष्टीने विचार करून बैठकीत चर्चा करेल, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे युती होणार की नाही, याचा अंतिम निर्णय त्या बैठकीतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्यथा, दोन्ही पक्षांचा मार्ग मोकळा राहणार आहे. त्यामुळेच या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

कार्ड कमिटी आज भूमिका ठरविणार 
युतीबाबत भाजप नेत्यांची बुधवारी रात्री बैठक झाली. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आमदार, पदाधिकारी; तसेच पक्षाच्या कार्ड कमिटीचे सदस्य त्यात सहभागी झाले होते. युती करायची झाल्यास जागांचे प्रमाण काय असावे, जागावाटप कसे असावे, आदी विविध मुद्द्यांवर या वेळी चर्चा झाली. कार्ड कमिटीच्या सदस्यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या सूचना पक्षाला द्याव्यात, असे बैठकीत ठरल्याची माहिती गोगावले यांनी दिली.

Web Title: Alliance will be decided on Friday