Vidhan Sabha 2019 : कामगारांच्या न्याय हक्कासाठी महाआघाडी प्रयत्नशील : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

- कामगारांचे अधिकार काढून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम भाजप सरकार करतंय

सहकारनगर (पुणे) : कामगारांचे अधिकार काढून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम हे भाजप सरकार करीत असून, कामगार, शेतकरी, गोर-गरिबांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करीत आहे, यासाठी येणाऱ्या निवडणूकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकार आल्यानंतर कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि आरोग्यासाठी प्रयत्न केले जातील आणि बेरोजगारांना रोजगार देऊन कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील राहील, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

निसर्ग मंगल कार्यालय येथे सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी कष्टकरी पथारी व्यवसाय पंचायत व हमाल पंचायत आणि श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियन मार्केटयार्ड यांनी महाआघाडीला पाठिंबा दिला. महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून  देण्याचा निश्चय केला. यावेळी खासदार अॅड. वंदना चव्हाण, महेश शिंदे, संतोष नांगरे, पथारी पंचायतचे बाळासाहेब मोरे, हमाल पंचायतचे नवनाथ बिनवडे, कामगार युनियन आप्पा कुडले, गोरख मेगडे, संदीप धायगुडे, संदीप मारणे, राजेंद्र चोरगे, संपत सुकाळे, रिक्षा पंचायतचे एस.वाघमारे उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आघाडीची सत्ता असताना हॉस्पिटल व इतर आरोग्याच्या सुविधा चांगल्या दिल्या. सहकारनगर भागातील येथे अत्याधुनिक सुविधा असणारे महाराष्ट्रातील पहिले महापालिकेच्या माध्यमातून उभारलेले पोटे दवाखानामध्ये संपूर्ण शरीराचा एमआरआय अल्प दरात केला जातो आणि चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या शिक्षिका उमेदवार अश्विनी कदम तीन वेळा नगरसेविका म्हणून काम पाहिले असून, त्यांना मनपा स्थायी समिती अध्यक्ष असताना कामाचा अनुभव आहे. त्यांच्या कामाचा जनता विचार करून येणाऱ्या काळात निश्चित निवडून येतील, असा दावा केला.

खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी शपथनामा जाहीर करून यातील प्रमुख मुद्दे सांगत कामगारांच्या कल्याणासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी संयुक्त पुरोगामी कटिबद्ध राहील, असा विश्वास व्यक्त करून हा जाहीरनामा नसून, शपथनामा आहे, असे सांगून शपथनामा वाचून दाखवला. यावेळी नितीन कदम यांनी भावनिक मत व्यक्त करीत उपस्थित नागरिकांचा विश्वास संपादन केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alliance will work hard for workers rights says Supriya Sule Maharashtra Vidhan Sabha 2019