मुलींच्या शिक्षणासाठी सायकलींचे वाटप

मिलिंद संगई
शनिवार, 16 जून 2018

बारामती शहर : घर आणि शाळेतील अंतर हे मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम करणारे ठरू नये या उद्देशाने पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने आगामी महिन्यात दहा हजार सायकलींचे विद्यार्थींनीना वाटप करण्यात येणार आहे. सायकल बँक या संकल्पनेतून या सायकली मुलींचे शिक्षण होईपर्यंत त्यांच्याकडे राहतील, संबंधित मुलीचे शिक्षण संपल्यानंतर दुस-या मुलींना या सायकली दिल्या जातील.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यात 7 हजार तर भोर, मुळशी, वेल्हा व खडकवासला परिसरातील मुलींसाठी तीन हजार अशा दहा हजार सायकलींचे वाटप जुलै महिन्यात होणार आहे. 

ग्रामीण भागातील मुलींना शाळेत चालत जावे लागते. यात त्यांचा वाया जाणारा वेळ व अनेकदा त्यामुळे त्यांची शाळेतून होणारी गळती यामुळे त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो. ही बाब विचारात घेऊन सुप्रिया सुळे यांनी पवार सार्वजनिक न्यास यांच्या माध्यमातून व टाटा ट्रस्ट व मेंटर्स या संस्थांच्या मदतीतून हा उपक्रम हाती घेतला आहे. गतवर्षी बारामती तालुक्यात जवळपास चार हजार सायकलींचे वाटप या उपक्रमाअंतर्गत केले गेले.

सुरक्षित वाटत...

चालत शाळेत जाण्यापेक्षा जेव्हा सायकलवरुन शाळेत गेलो तेव्हा लवकर पोहोचलो, वेळ वाचला पण सर्वात महत्वाच म्हणजे सुरक्षित वाटल....अशी बोलकी प्रतिक्रीया विद्यार्थीनींनी दिल्या होत्या. 

गीनीज बुकमध्ये नोंदीचा प्रयत्न 

या उपक्रमाची नोंद गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये व्हावी असा प्रयत्न आहे. एकाच उपक्रमात इतक्या मोठ्या संख्येने सायकलींचे वाटप हा जागतिक स्तरावरील विक्रम असू शकतो, त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत.

प्रत्येक विद्यार्थीनीला सायकल

शिक्षणाला उपयुक्त असणारी सायकल राज्यातील प्रत्येक गरजू विद्यार्थीनीपर्यंत पोहोचली पाहिजे, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विचार आहे, त्या दृष्टीने तसा एक महत्वाकांक्षी आराखडा सध्या तयार होत आहे. केवळ घरापासून शाळेचे अंतर अधिक म्हणून मुलींचे शिक्षण बंद होऊ नये, या उद्देशाने सायकल बँकचा प्रयोग राज्यात राबविण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. 

Web Title: Allocating bicycles for girls' education