आंबे पिकविण्यासाठी "इथेपॉन'ला परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

 आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली.

पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला. 

आंबा हंगाम सुरू झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील अडते असोसिएशनची एफडीएने बैठक घेतली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी उल्हास इंगवले, रमाकांत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, सचिव रोहन उरसळा आदी पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते. 

दिल्लीच्या भारतीय अन्न सुरक्षा मानदे (एफएसएसएआय) यांच्याकडे "इथेपॉन' हे फळ पिकविण्यासाठी वापरण्यात यावे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. त्यावर संशोधन व तपास करून यावर्षी "इथेपॉन' पावडर वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. या वेळी या पावडरचा वापर करताना ती फळाच्या प्रत्यक्षात संपर्कात न आणता एका आवरणात (पॅक) करून ते आंबा पिकविण्यासाठी ठेवता येईल. त्याशिवाय नैसर्गिकरीत्या आंबे पिकविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केल्या. 

व्यापारी अथवा आंबा विक्रेत्यांकडून आंबा किंवा इतर फळे पिकविताना कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. तसे आढळल्यास नागरिकांसह व्यापाऱ्यांनी याबाबत शंका आल्यास टोल फ्री क्रमांक 180022365 येथे तक्रार करावी, असे आवाहन एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले.

Web Title: Allow estepona to grow mangoes