अँबेसिडर बनल्या पांढरा हत्ती

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

महापालिकेकडील अँबेसिडर मोटारी जुन्या झाल्या आहेत. त्या अचानक रस्त्यात बंद पडतात. कंपनीने मोटारीचे उत्पादन बंद केल्यापासून त्यांचे सुटे भागही लवकर मिळत नाहीत. त्यामुळे या मोटारी महिन्यातील १० ते १२ दिवस गॅरेजमध्ये असतात. त्यामुळे ३४ पैकी काही मोटारी ताफ्यातून काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- नितीन उदास, उपायुक्त, महापालिका

पुणे - महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये अद्याप अँबेसिडर मोटारीची क्रेझ आहे. दुसरी मोटार उपलब्ध असेल तरी ते आवर्जून अँबेसिडर मागून घेतात. आता या मोटारी दहा वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाल्या असून, वारंवार बंद पडत आहेत. त्या महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत असून, एका मोटारीसाठी महिन्याला ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे.

हिंदुस्थान मोटर्सची अँबेसिडर मोटार लोकप्रिय होती. या मोटारीमधून फिरण्याला प्रतिष्ठा होती. पूर्वी अनेक मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी या मोटारीला पसंती देत. महापालिकेच्या ताफ्यात नवीन मोटारी आल्या तरी अँबेसिडरला अद्यापही मागणी कायम आहे. महापालिकेच्या ताफ्यात ३४ अँबेसिडर मोटारी असून, त्या गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्या सेवेत आहेत. हिंदुस्थान मोटर्सने २०१४ मध्ये अँबेसिडर मोटारीचे उत्पादन बंद केले. तेव्हापासून महापालिकेला मोटारींची देखभाल करणेही अवघड झाले आहे. 

अँबेसिडर मोटारी जुन्या झाल्याने त्या वारंवार बंद पडतात आणि त्यांचे सुटे भागही उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत या मोटारींची देखभाल करण्यासाठी महिन्याला किमान ३० ते ४० हजार रुपये खर्च येत आहे. चालकाचे वेतन धरून ही रक्कम ७० हजारांपर्यंत जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambassador Motor Craze Loss Municipal