आंबेगावात बिबट्याची डरकाळी वाढली

नवनाथ भेके
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

आंबेगाव तालुक्‍यात सध्या बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. बिबट्यांनी चार वर्षांत २६० जनावरांचा फडशा पाडला असून अलीकडच्या दोन वर्षांतील तो आकडा २०६ इतका आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

आंबेगाव तालुक्‍यात सध्या बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. बिबट्यांनी चार वर्षांत २६० जनावरांचा फडशा पाडला असून अलीकडच्या दोन वर्षांतील तो आकडा २०६ इतका आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

आंबेगाव तालुक्‍यात सध्या साडेसहा हजार हेक्‍टर ऊसक्षेत्र असून मागील चार ते पाच वर्षांत ऊस लागवडीत दुपटीने वाढ झाली आहे. हेच ऊसक्षेत्र बिबट्यांचे आश्रयस्थान बनले आहे. त्याचबरोबर मानवी वस्तीवर पाळीव प्राणी भक्ष्य म्हणून मिळू लागल्याने बिबट्या आता वस्तीजवळच राहू लागले आहेत. कुत्री, वासरे, शेळ्या, मेंढ्या आदी प्राण्यांची शिकार त्यांना अलगद मिळत आहे.

दोन वर्षांत हल्ल्यांत वाढ
तालुक्‍याच्या पूर्व भागातील मंचर वन विभागाच्या कार्यालयांतर्गत मंचर, कळंब, वळती व धामणी हे विभाग येतात. या विभागात गेल्या चार वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात १८८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यात शेळ्या, वासरू, घोडी आदींचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत हल्ल्यात वाढ दिसून आली आहे. सन २०१५-१६ मध्ये २६, २०१६-१७ मध्ये १४, २०१७-१८ मध्ये ५६, तर २०१८-१९ मध्ये ९२, तर घोडेगाव वन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या पश्‍चिम पट्ट्यात २०१५-१६ मध्ये ८, २०१६-१७ मध्ये ६, २०१७-१८ मध्ये १३, तर २०१८-१९ मध्ये ४५ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. दोन वर्षांतील संख्या अधिक आहे. काही जनावरे बिबट्या लंपास करतो, तसेच काही मृत्यूची माहिती वन विभागापर्यंत पोचत नाही, त्यामुळे या आकड्यात अजूनही वाढ होऊ शकते. पाळीव कुत्र्यांचा आकडाही मोठा आहे, जनावरांच्या मृत्यू प्रकरणातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे; परंतु मिळणारी रक्कम किमतीच्या ७५ टक्केच मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.

पिंजऱ्यांची वानवा
आंबेगाव तालुक्‍यात बिबट्यांचे हल्ले वाढत चालले असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बिबट्याचा वावर ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी तातडीने पिंजरा लावणे गरजेचे आहे; परंतु वन विभागाकडे पिंजऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे वन विभागाकडून चालढकल केली जाते. पिंजरा लावण्यासही शेतकऱ्यांनाच खर्च करून तो आणावा लागत आहे. मंचर कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या मंचर, कळंब, वळती व धामणी या चार विभागात ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठी आहे त्या ठिकाणी अवघे चार पिंजरे आहेत, त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यास वन विभागाकडून टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. तालुक्‍याच्या पूर्व भागात बिबट्यांकडून हल्ले होत आहेत, काही ठिकाणी दिवसाही बिबटे दिसत असल्याने वन विभागाने  तातडीने पिंजरा लावून त्यांना पकडले पाहिजे. 

जनजागृतीची गरज
आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील निरगुडसर, मेंगडेवाडी, जवळे, भराडी, शिंगवे, वळती, नागापूर, थोरांदळे गावासह घोडेगाव परिसरात बिबट्यांचा वावर अधिक प्रमाणात आहे. त्यात नुकतेच लौकी या ठिकाणी दोन बिबटे मोबाईलच्या कॅमेऱ्यात, तर चांडोली बुद्रुक येथे दोन बिबटे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत. विशेषतः घोडनदी नजीकच बिबट्यांचा अधिक प्रमाणात वावर आहे त्यामुळे नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले आहेत. वन कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन बिबट्यापासून कोणती सावधगिरी बाळगावी, बिबट्या प्राणी कसा आहे, तो मानवावर हल्ला करतो की नाही?, करत असेल तर तो कधी करतो, त्यावर उपाययोजना कोणत्या कराव्यात, अशा विविध प्रकारची जनजागृती प्रत्येक गावागावांत वन विभागाने केली पाहिजे.

Web Title: Ambegaon Leopard