
Pune News : आंबेगावच्या पुर्वभागात गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येतील; तहसीलदार रमा जोशी
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागात काल शनिवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीने नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येतील अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
तालुक्याच्या पुर्वभागातील धामणी, लाखणगाव, खडकवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा ज्ञानेश्वरवस्ती द्रोणागिरीमळा या परिसराला काल शनिवारी सायंकाळी गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला असून रस्ते शेतात,
गोठ्यात, घराच्या अंगणात गारांचा अक्षरशा खच पडला आहे गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहे. आज रविवारी सकाळीच तहसीलदार रमा जोशी यांनी या सर्व गावांना भेट देऊन थेट नुकसान झालेल्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली
तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांशी संवादही साधला त्यांच्या समवेत नायब तहसीलदार दामूराजे असवले, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक विभागाचे मंडल अधिकारी विश्वास शिंदे, तलाठी विशाल मुंगळे, कृषी सहाय्यक प्रविण मिर्के , कृषी सहाय्यक निशा शेळके, कोतवाल विकास दाभाडे, कोतवाल सुभाष पंडीत हे होते.
यावेळी बोलताना तहसीलदार रमा जोशी म्हणाल्या नुकसान झालेल्या शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरु असतानाही आज रविवार सुट्टीचा वार असूनही महसूल तसेच कृषी विभागाचे कर्मचारी हे या पाहणी दौऱ्याच्या वेळी हजर होते तसेच सर्व कर्मचाऱ्यांना गारपीटीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कामावर रुजू होण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
या दौऱ्याच्या वेळी धामणी येथे सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव, अक्षय विधाटे ,बढेकरमळा येथे श्याम बढेकर, संजय बढेकर, सुरेश विधाटे, सुरेश बढेकर, गोरक्ष विधाटे, लाखणगाव येथे पोलीस पाटील कल्पिता बोऱ्हाडे, शिरीष रोडे पाटील, पोंदेवाडी येथे उपसरपंच महेंद्र पोखरकर, अमोल वाळुंज, संदीप पोखरकर, जयसिंग पोंदे, सुशांत रोडे या शेतकर्यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली.