शेतात काम करताना समोरच आला बिबट्या, अखेर...

नवनाथ भेके
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर, जवळे, भराडी, निरगुडसर, थोरांदळे आदी परिसरात बिबटयाचा वावर वाढला आहे. त्यामध्ये अनेक दिवसांपासून नागापूर गावाच्या उत्तरेला असलेल्या मिंडे मळ्यात बिबट्याचा वावर होता.

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर डरकाळी फोडणाऱ्या बिबटयाला अखेर वनविभागाला पकडण्यात यश आले आहे. नागापूर (ता. आंबेगाव) येथील मिंडे मळ्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (ता. १) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

Image may contain: indoor

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर, जवळे, भराडी, निरगुडसर, थोरांदळे आदी परिसरात बिबटयाचा वावर वाढला आहे. त्यामध्ये अनेक दिवसांपासून नागापूर गावाच्या उत्तरेला असलेल्या मिंडे मळ्यात बिबट्याचा वावर होता. येथील शेतकऱ्यांना शेतीकामे करताना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले होते. तीन दिवसांपूर्वी येथील शेतकरी सोमनाथ मिंडे, तेजस मिंडे हे शेतात काम करत असताना बिबट्या त्यांच्यावर गुरकला होता. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात प्रचंड घबराट पसरली होती. 

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

याबाबत सोमनाथ मिंडे व इतर शेतकऱ्यांनी नागापूरच्या सरपंच सुजाता नामदेव रिठे, पोलिस पाटील संजय पोहकर यांना ही माहिती दिली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारी (ता. ३०) वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने मिंडे मळ्यात पिंजरा लावला. त्यात शनिवारी सकाळी साडेसहा वाजता बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या नर जातीचा असून, साडेतीन वर्ष वयाचा आहे या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
  
जवळे व निरगुडसरलाही पिंजरा लावावा...
जवळे येथे पाच दिवसांपूर्वी बिबटयाने आठ फूट उंचीवरुन उडी मारून दोन शेळ्या ठार मारल्या होत्या. त्यानंतर शेतकरी जागा झाल्याने अनेक शेळ्यांचा जीव वाचला होता. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी पोलिस पाटील रवींद्र लोखंडे व शेतकरी संभाजी बोराटे यांनी केली आहे. तसेच, निरगुडसर येथे नह्यार मळ्यात बिबटयाचा वावर वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणीही पिंजरा लावण्याची मागणी सतीश भेके यांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ambegaon taluka, a leopard was caught