2019 मध्ये बारामती तालुक्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी योजना

मिलिंद संगई
रविवार, 30 डिसेंबर 2018

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बव्हतांश काम पूर्ण झाले असून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून येथे शिक्षण सुरु करण्याचा प्रयत्न आहे. मेडीकल कॉलेज सुरु झाल्यानंतर या परिसराचा कायापालट होणार आहे. या शिवाय बारामती फलटण या 37 कि.मी.लांबीच्या रेल्वेमार्गाचे भूसंपादन संपून प्रत्यक्ष कामाला या वर्षात प्रारंभ होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे दक्षिण रेल्वेच्या नकाशावर बारामती एक प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून अधोरेखीत होईल.

बारामती- येणारे नवीन वर्ष बारामती शहर व तालुक्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. सन 2019 मध्ये तालुक्याच्या दृष्टीने अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु होणार आहेत तर काही योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे. बारामतीकरांचे जीवन अधिक सुखकर करणाऱ्या या बाबी असून शहराच्या अर्थकारणावरही याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बव्हतांश काम पूर्ण झाले असून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून येथे शिक्षण सुरु करण्याचा प्रयत्न आहे. मेडीकल कॉलेज सुरु झाल्यानंतर या परिसराचा कायापालट होणार आहे. या शिवाय बारामती फलटण या 37 कि.मी.लांबीच्या रेल्वेमार्गाचे भूसंपादन संपून प्रत्यक्ष कामाला या वर्षात प्रारंभ होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे दक्षिण रेल्वेच्या नकाशावर बारामती एक प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून अधोरेखीत होईल.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे चौपदरीकरणाचा निर्णय झाला असून पाटस ते बारामती व इंदापूरपर्यंतच्या रस्त्याचे कामही याच वर्षात सुरु होईल. या मुळे पायाभुत सुविधांचे जाळे अधिक मजबूत होणार असल्याने त्याचा बारामतीकरांना फायदा होईल.

बारामती शहराच्या दृष्टीने सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प व कचरा डेपो निर्मूलन करुन कचरा प्रक्रीया प्रकल्प उभारणी 2019 मध्ये होणार आहे, त्या मुळे स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक प्रभावी काम उभे राहणार आहे. कऱ्हा नदीत सोडले जाणारे पाणी थांबून सांडपाण्यावर प्रक्रीया होऊन ते पाणी शेतीसाठी वापरले जाईल.

बारामती दौंड या रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाचे काम सध्या वेगाने सुरु असून डिसेंबर 2019 पर्यंत हे काम संपविण्याचा रेल्वेचा प्रयत्न असेल. या शिवाय एमआयडीसीतील 20 एकरांवर भव्य जिल्हा क्रीडा संकुलातील विविध कामांनाही या वर्षात प्रारंभ होण्याची शक्यता आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील प्रवेश सुरु होण्याची शक्यता
- बारामती फलटण रेल्वेमार्गाचे काम सुरु होणार
- पाटस-बारामती-इंदापूर पालखी मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु होणार
- बारामती- फलटण मार्गाचे काम सुरु होण्याची शक्यता
- बारामती शहरातील सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प कार्यान्वित होणार
- बारामतीतील कचरा डेपोचे निर्मूलन होऊन प्रक्रीया प्रकल्प होणार
- बारामती दौंड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मार्गी लागणार
- बारामतीतील नवीन साठवण तलावाचे काम मार्गी लागणार
- तीन हत्ती चौक ते कोर्ट कॉर्नर सेवा रस्त्याचे काम मार्गी लागणार
- चार कोटींचे जिल्हा क्रीडा संकुल एमआयडीसीत साकारणार

Web Title: Ambitious scheme for Baramati taluka in 2019