वाहतूक कोंडीत अडकल्या रुग्णवाहिका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह राबवीत वाहनचालकांकडून दंडाच्या पावत्या फाडणाऱ्या वाहतूक शाखेला दापोडी ते बोपोडीदरम्यान दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यास मात्र वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. दररोज लाखो वाहनचालकांना या रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना सोमवारी सायंकाळी दोन रुग्णवाहिकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. 

वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताह यशस्वीरीत्या राबविल्यामुळे एकीकडे कौतुक सोहळा केला जात होता; तर दुसरीकडे त्याचवेळी दापोडी ते बोपोडी दरम्यानच्या रस्त्यावर वाहनांच्या दूरवर रांगा लागल्याचे चित्र होते. सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर या मार्गावर वाहनांची गर्दी होण्यास सुरवात झाली. सायंकाळी सात वाजल्यानंतर वाहनांची गर्दी आणखीनच वाढत गेली. त्याचसुमारास पिंपरी-चिंचवडहून पुण्याच्या दिशेने आलेल्या दोन रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या. रुग्णवाहिकेच्या चालकांनी कशीबशी रुग्णवाहिका विरुद्ध दिशेने पुण्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. समोरून रुग्णवाहिका येत असताना रुग्णवाहिकेस वाट करून देण्याऐवजी बहुतांश वाहनचालक रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण करत असल्याचे चित्र होते. 

पिंपरी-चिंचवडहून पुण्याच्या दिशेने आणि पुण्याहून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने सकाळी व सायंकाळी दररोज लाखो वाहनांची ये-जा सुरू असते. हॅरिस पुलाच्या ठिकाणी रस्ता निमुळता होतो. त्यामुळे रहदारीच्या वेळी या ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली. 

पिंपरी-चिंचवडहून सायंकाळी सहा वाजल्यानंतर दापोडीपर्यंत वाहने वेगात येतात. मात्र तेथून पुढे हॅरिस पुलावरून खडकी रेल्वे स्थानकापर्यंत पोचण्यासाठी अर्धा ते एक तास लागतो. सोमवारी सायंकाळीही वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वीस मिनिटे लागली. आमच्यासारखे हजारो वाहनचालक या वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. अनेकदा या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकून पडतात. या वाहतूक कोंडीमुळे एखाद्या रुग्णाचा जीव जाण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. 
-विकास वानखेडे, वाहनचालक. 

Web Title: Ambulance in a traffic jam