आदिवासींसाठी रुग्णवाहिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम संस्कृती संस्था फलोदे यांच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. आठ लाख ५० हजार रुपये किमतीची रुग्णवाहिका असून, यामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा व उपकरणे आहेत. या रुग्णवाहिकेचा उपयोग ४० आदिवासी गावे व वाड्यावस्त्यांना होणार आहे.

फलोदे (ता. आंबेगाव) येथे कॉम्प्टीटर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार भोसले, रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या अध्यक्षा कांता नाईक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा झाला. या वेळी डॉक्‍टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण दरक, सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक चंद्रशेखर पाटील, धर्मादाय आयुक्त नगर कार्यालयातील अधिकारी किरण लोहोट, माजी नायब तहसीलदार विजय केंगले, सुरेश भवारी, पंचायत समिती आंबेगाव तालुक्‍याचे माजी उपसभापती सलीम तांबोळी उपस्थित होते. डॉ. भोसले, सरपंच मनीषा मेमाणे, सामाजिक कार्यकर्ते राजू घोडे, कृष्णा वडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

भीमाशंकरसह आदिवासी डोंगरी भागातील ४० गावांसाठी १०८ ची रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी किसानसभेच्या माध्यमातून ऑगस्ट २०१८ मध्ये तीन दिवसांचे उपोषण झाले होते. त्यानंतर या भागात १०८ ची रुग्णवाहिका उपलब्ध झाली होती. पण, रुग्णांची संख्या अधिक असल्याने सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने अजून एक रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. या रुग्णवाहिकेची व्यवस्था शहीद राजगुरू ग्रंथालय फलोदे ही संस्था करणार आहे.
- अमोल वाघमारे, प्रमुख, किसान सभा, आंबेगाव तालुका 

Web Title: Ambulance for Tribal