घराणेशाही देशाचे भले करू शकत नाही - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे - घराणेशाहीच्या व्यवस्थेला आर्य चाणक्‍य यांनी पूर्ण ताकदीने विरोध केला. ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ नाही, असा विचारही त्यांनी मांडला, असे सांगत आणि घराणेशाही देशाचे भले करू शकत नाही, ही चाणक्‍यनीती पटवून देत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसवर अप्रत्यक्षरीत्या तोफ डागली. "सबका साथ, सबका विकास' या चाकणक्‍यनितीच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार करीत आहेत, हे सांगायलाही शहा विसरले नाहीत.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात "आर्य चाणक्‍य-जीवन और कार्य - आज के संदर्भ मे' या विषयावर शहा बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार मंगलप्रभात लोढा, प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध देशपांडे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, रवींद्र साठे, व्ही. सतीश आणि रेखा महाजन आदी उपस्थित होते.

राजाला एकच पुत्र असेल; पण राज्यकारभारासाठी तो योग्य नसेल तर त्याची राजा म्हणून निवड करू नये. जनतेतून आलेले नेतृत्व देशाचे भले करू शकते, ही एकप्रकारची "चाणक्‍यनीती'ही शहा यांनी व्याख्यानातून उलगडून दाखविली. अर्थशास्त्रासह समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, संरक्षणशास्त्र, परराष्ट्र नितीतील चाणक्‍यनीतीचे दाखले देत त्यांनी मोदींच्या कार्यपद्धतीचा पाया चाणक्‍यनितीचा असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'राजकारण्यांनी आपली जीवनशैली अत्यंत साधी ठेवावी. लोकांसाठी सहजरीत्या उपलब्ध व्हावे. राजा हा राज्याचा प्रधानसेवक असतो, असे चाणक्‍यने सांगितले होते. तेव्हा चाणक्‍य आणि मोदी यांचे "स्पिरीट' एकच वाटते. म्हणूनच मोदी स्वतःला प्रधानसेवक म्हणतात.''
राज्याच्या सर्व नागरिकांना सर्वज्ञ बनविणे, हा उद्देश शिक्षणाचा असला पाहिजे, असे चाणक्‍यनीतीत सांगितले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या गुणांना अभिव्यक्त होता येईल, अशी व्यवस्था असावी. ही व्यवस्था राजाश्रयावर आधारित नको, तर लोकाश्रयावर आधारित हवी, असेही शहा यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देशपांडे यांनी केले.

शहांनी उलगडली चाणक्‍यनीती
- परराष्ट्र धोरणात आपल्या राष्ट्राचे हित आणि दुसऱ्या राष्ट्राचा क्षय यावर भर असला पाहिजे.
- साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर राजासाठी नाही, तर राष्ट्रासाठी केला पाहिजे.
- जे काम करताना अंतरात्मा कचरेल ते असत्य, प्रोत्साहन देईल ते सत्य.
- राज्यात भ्रष्टाचार शाश्‍वत आहे. त्याला पकडणे अवघड आहे.

Web Title: amit shaha politics