मुक्त संवादातून उलगडली "बनगरवाडी'मागची कथा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पडद्यावर हलणारी चित्र आणि त्या अनुषंगाने उलगडणारी गोष्ट यापलीकडे जाऊन चित्रपट पाहण्याचा प्रयत्न प्रेक्षक करत नाहीत. ही माझी खंत आहे. 
- अमोल पालेकर, दिग्दर्शक 

पुणे - "बनगरवाडी' या व्यंकटेश माडगूळकरांनी (तात्या) लिहिलेल्या साहित्यकृतीने मराठी साहित्यविश्‍वात वेगळा इतिहास रचला. अशा कादंबरीवर चित्रपट तयार करणे हे शिवधनुष्य पेलण्यासमान होते. ते पेलताना आलेले अविस्मरणीय अनुभव, दिग्गजांशी जुळलेला स्नेह, त्यांच्याकडून मिळालेले धडे दिग्दर्शक अमोल पालेकर सांगत होते. या निमित्ताने सांस्कृतिक इतिहासच पालेकरांच्या शब्दांमधून प्रेक्षक अनुभवत होते. 

निमित्त होते व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठान, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय यांच्यातर्फे आयोजित दोनदिवसीय "व्यंकटेश माडगूळकर चित्रपट महोत्सवा'चे! या वेळी पालेकरांनी श्रोत्यांशी मुक्त संवाद साधला. त्यामुळे "बनगरवाडी'वर चित्रपट तयार होताना पडद्यामागे अनुभवलेली कथा उलगडत गेली. 

पालेकर म्हणाले, ""अनेक दिग्गज लोकांकडून नाकारली गेलेली मुलगी (बनगरवाडी) माझ्या पदरात आली. त्याचे दडपण माझ्यावर होते. शिवाय, विविध भाषांत भाषांतरित झालेली आणि अतिशय गाजलेली साहित्यकृती पडद्यावर उभारताना आपण कमी पडणार नाही ना, असा प्रश्‍नही मनात सतत पडायचा; पण हे दडपण तात्यांमुळे दूर झाले. चित्रपटाची पटकथा तात्यांनीच लिहिली. सुरवातीला ती मला म्हणावी इतकी आवडली नाही. हे मी त्यांना बोलून दाखवले. इतके मोठे लेखक असूनही त्यांनी माझे ऐकून घेतले. पटकथेतील न आवडलेल्या गोष्टी सांगितल्यानंतर तात्यांनी त्या नव्याने लिहिल्या. यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते.'' 

गुणगुणत, एकाग्र होऊन ते लिहीत असायचे. स्वत:च्याच कलाकृतीबाबत अलिप्तता बाळगून त्यावर नव्याने दृष्टिकोन टाकू शकतो का, हा मोठा गहन प्रकार तात्या अगदी सहजतेने आणि आनंदाने करायचे. हे "बनगरवाडी'च्या निमित्ताने मला पाहायला आणि शिकायला मिळाले, असेही पालेकर यांनी सांगितले. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, अभिनेत्री आदिश्री अत्रे, प्रतिष्ठानच्या प्रमुख ज्ञानदा नाईक उपस्थित होत्या. शुभांगी दामले यांनी सूत्रसंचालन केले. "बनगरवाडी' चित्रपटाच्या सादरीकरणाने महोत्सवाची सांगता झाली. 

Web Title: Amol Palekar