स्वतःला गहाण न ठेवता... (अमोल पालेकर)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

सध्या तरी शाल्मली आठवड्याभरासाठी येणार आहे. कारीनला, माझ्या नातवाला घेऊन! त्याला माझ्या स्टुडिओत नेऊन दोघांनी आपापली चित्र काढत बसण्याचे वेध लागले आहेत. तितक्‍याच ओढीने वर्ल्डकपसाठी सहा आठवडे ब्रिटनमध्ये मुक्काम करण्याचेही योजले आहे. सर्व भारतीयांसाठी २०१९ हे वर्ष महत्त्वाचे आहे. ‘आपला देश हिंदुस्तान न होता ‘भारत’च राहण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून The Resistible Rise of Arturo Ui हे बर्तोल ब्रेश्‍टचं नाटक बसव, या संध्याच्या आग्रहाचा विचार करतोय. नोव्हेंबरमध्ये एक हिंदी सिनेमा बनवायचा म्हणतोय. 

समीहाने इंडोनेशियातल्या बिनतान बेटावर नेण्याचा घाट घातला आहे. डच आणि बौद्ध आर्किटेक्‍चर, भरपूर दिवाळी अंक, मायलेकींची चटर आणि इतर सगळी धमाल! गेली वीस वर्षे संध्या आयुष्यात आल्यापासून माझ्या जगण्याचा वेगच इतका आहे, की कंटाळा, रिकामपण, साचलेपणा याला स्थानच उरलं नाही. काल रात्रीच THE GUILT नावाचा डेन्मार्कचा नवा सिनेमा बघितला.

एका खोलीच्या ऑफिसमध्ये बसून आपत्कालीन फोन सेवेची ड्यूटी एका रात्रीसाठी करत असणारा पोलिस या एकाच व्यक्तिरेखेवर संपूर्ण सिनेमाभर कॅमेरा आहे. मदतीसाठी आवाहन करणाऱ्या एका बाईचा फोन कॉल आणि त्या संदर्भात त्यानं घेतलेल्या निर्णयांची गुंतागुंत... आवर्जून बघावा असा अप्रतिम सिनेमा.. minimalist yet amazingly engaging! त्याच्या काही तास आधीच एका नवीन हिंदी वेब सीरियलमध्ये महत्त्वाची भूमिका करण्याच्या करारावर मी सही केली. डिसेंबरपासून शूटिंग सुरू होईल. अजूनही आठवड्याला एक-दोन सिनेमे, वेबसीरियल्स, जाहिराती यासाठी विचारणा होत असते. ‘नाही’ असे माझे उत्तर ठरलेले असते. कारण आवर्जून करावं असं त्यात काहीच नसतं; आणि फक्त पैसे मिळवण्यासाठी मी आजवर जर काहीच केलं नाही तर आयुष्याच्या या टप्प्यावर का करावे? मी रोखठोक माझी भूमिका कायम मांडत आलो आहे; त्याचं खरं कारण हे आहे की, मी आयुष्य फक्त माझ्या टर्म्सवर जगलो आहे, कोणत्याच बाह्य अपेक्षांसाठी स्वतःला गहाण न ठेवता!

व्यवस्थेकडून एकदा का तुम्ही मागू लागलात की व्यवस्थेला, राजकारण्यांना मिंधं राहणं अटळ असतं. माझ्या या स्वभावाची पुरेपूर किंमत मी आयुष्यभर चुकवली आहे. पण त्याविषयीही मला कोणतीही खंत नाही. मागच्या वर्षी याच दिवशी माझं चित्रांचं प्रदर्शन अमेरिकेमध्ये होतं. त्यात २५ पैकी २३ कॅनव्हास विकले गेले. ८० टक्के कमाई एका विधायक सामाजिक उपक्रमासाठी देऊन टाकली. चित्रकला हे माझे पहिले प्रेम! खिशात फुटकी कवडी नसतानाही abstract art करण्याचा माज केला! सिनेमातल्या धो-धो यशानंतरही त्याच-त्याच भूमिका नाकारण्याचा माज केला! स्वतःलाच आव्हान देण्यासाठी आणि वैविध्य साधण्यासाठी अपयशी होण्याचा धोका मी डोळसपणे पत्करला. चित्रकलेचा अंतर्मुखी प्रवास गेली तीन-चार वर्षे सुरू असल्यामुळे आयुष्याचा एकूणच सम्यक आढावा घेणे सातत्याने चालू राहते. वर्तमानातला कुठला तरी एक काप गतकाळातल्या तशाच एखाद्या तुकड्यासमोर ठेवून त्या दोन्हींची तुलना करण्याचा एक गंमतशीर खेळ मी खेळत राहतो.

आत्ताच मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी केलेल्या दाव्याची सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार असल्याचं वकिलांकडून समजलं. रंगमंचावर सादर होण्यापूर्वी नाटकाच्या संहितेला राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असते त्यामुळे संहितेमध्ये ढवळाढवळ करण्याचे स्वैर स्वातंत्र्य मोजक्‍या लोकांच्या हातात राहते. भारतात महाराष्ट्र आणि गुजरात या फक्त दोन राज्यांमध्येच पूर्वपरवानगीचा कायदा अस्तित्वात आहे, त्याला मी आव्हान दिले आहे. जवळजवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वीही वासनाकांडच्या निमित्ताने असाच लढा न्यायालयामध्ये मी लढलो होतो. अशी तुलना करत राहिल्यानंतर आयुष्याला असलेल्या एका संगतीची जाणीव होते; साहजिकच स्मरण रंजनामध्ये गुंतून राहत नाही. म्हणूनच खरं तर मला आत्मचरित्र किंवा तत्सम काही लिहिणं आवडत नाही. खूप जण मी ते करावं म्हणून माझ्या मागे आहेत. बघू पुढे कधीतरी शक्‍य झालं तर! 

सध्या तरी शाल्मली आठवड्याभरासाठी येणार आहे. कारीनला, माझ्या नातवाला घेऊन! त्याला माझ्या स्टुडिओत नेऊन दोघांनी आपापली चित्र काढत बसण्याचे वेध लागले आहेत. तितक्‍याच ओढीने वर्ल्डकपसाठी सहा आठवडे ब्रिटनमध्ये मुक्काम करण्याचेही योजले आहे. सर्व भारतीयांसाठी २०१९ हे वर्ष महत्त्वाचे आहे. ‘आपला देश हिंदुस्तान न होता ‘भारत’च राहण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून The Resistible Rise of Arturo Ui हे बर्तोल ब्रेश्‍टचं नाटक बसव, या संध्याच्या आग्रहाचा विचार करतोय. नोव्हेंबरमध्ये एक हिंदी सिनेमा बनवायचा म्हणतोय. 

या सगळ्याबरोबरच दुपारची एक तासाची श्रोडिंगरसोबतची मस्त डुलकी हक्काची! 
खूप झालं की रे...काळाच्या सर्वच ओघांमध्ये तितक्‍याच उरफाट्या पद्धतीने आजही पोहता येत असेल तर त्याच्यापेक्षा या घटकेला अजून जास्त मी काय मागू? एक दिवस दमछाक होईल तेव्हा संपून जाईन...तोपर्यंत भेटत राहूच!

Web Title: Amol Palekar birthday celebration with wife Sandhya Gokhale