दंडाची रक्‍कम आता मोबाईलवर 

दंडाची रक्‍कम आता मोबाईलवर 

पुणे - डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने आपण खरेदी केली, पेट्रोल भरले तर दुसऱ्या क्षणाला आपल्या स्मार्टफोनवर त्याचा संदेश येतो... अगदी त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या चौकात नियम मोडला, तर लागलीच तुमच्या मोबाईलवर संदेश येईल आणि त्यानंतर तुमचे छायाचित्र आणि दंडाची रक्कम, ऑनलाइन भरण्याची सूचनाही येईल... ही योजना अंतिम टप्प्यात असून, ती कार्यान्वित झाल्यास बेशिस्त वाहनचालकांवर चाप बसणार आहे. 

पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी त्यांनी सुरवातीला प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची संख्या वाढविली. खाकी गणवेशातील पोलिसही नेमले. वाहतुकीच्या नियमांची जनजागृती व्हावी, यासाठी हेल्मेट रॅलीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वाहतूक शाखेकडून "सेफ स्ट्रीट' अभियान सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सीसीटीव्हींचा वॉच ठेवण्यात येत आहे. 

नियमाचे उल्लंघन केल्यानंतर काही वाहनचालक पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. मी नियमाचे उल्लंघन केलेच नाही, यावरून पोलिसांना शिवीगाळ आणि मारामारी केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, आता कोठे आणि कोणत्या नियमाचे उल्लंघन केले, हे आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येणाऱ्या मेसेजमध्येच दिसणार आहे. त्यामुळे नियम मोडल्याचा पुरावाच संबंधित वाहनचालकाच्या हाती पडणार आहे. 

काय आहे योजना 
शहरात प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये सीसीटीव्ही आहेत. मुख्य सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष पोलिस आयुक्‍तालयात असून, वाहतूक शाखेतही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण कक्षातील पोलिस मोठ्या स्क्रीनवर तसेच संगणकावरील स्क्रीनवर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवतील. एखाद्या वाहनचालकाने नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून येताच त्याचे छायाचित्र संबंधित वाहनचालकाच्या मोबाईलवर पाठविण्यात येईल. सिग्नलचे उल्लंघन करून पुढे गेल्यास दुसऱ्या सिग्नलवर पोचेपर्यंत त्याला मोबाईलवर छायाचित्र आणि दंडाची रक्‍कम किती, याबाबत संदेश पाठविण्यात येईल. 

मोबाईल क्रमांक कळीचा मुद्दा 
शहरातील बहुतांश वाहनचालकांचे मोबाईल क्रमांक वाहतूक शाखेकडे उपलब्ध आहेत. परराज्यांतून आणि अन्य शहरात नोंदणी केलेल्या वाहनांच्या मालकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. अन्य शहरातील नोंदणीकृत वाहनांची येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ कार्यालयात मोबाईल क्रमांकासह नोंदणी बंधनकारक केल्यास हा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. 

वाहतूक पोलिसांकडून स्वाइप मशिनचा वापर 
नियम मोडणाऱ्या चालकांकडून काही ठिकाणी स्वाइप मशिनद्वारे दंड वसूल करण्यात येत आहे. यात संबंधित वाहनचालकाचे छायाचित्र घेण्याची सुविधा आहे. वाहन परवाना क्रमांक, परवाना नसेल तर वाहन क्रमांक, कोणत्या नियमाचे उल्लंघन झाले आणि तडजोड शुल्क (दंड) याबाबत माहिती उपलब्ध होते. या मशिनमध्ये डेबिट कार्ड स्वाइप करून दंड जागेवर भरणे शक्‍य होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com