भाजप, राष्ट्रवादीला फायदा अन्‌ फटकाही

Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation

पुणे : अंतिम प्रभागरचनेत जाहीर झालेल्या बदलामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीला काही ठिकाणी फायदा तर काही ठिकाणी फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

धनकवडीमध्ये माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी गटनेते वसंत मोरे स्वतंत्र पॅनेलमधून परस्परांविरुद्ध रिंगणात येतील. सिंहगड रस्ता आणि कर्वेनगरमधील प्रभागात बदल झाल्यामुळे भाजपचे पारडे जड झाले असून केळेवाडी, वारजे माळवाडीत "राष्ट्रवादी'ला फायदा होऊ शकतो. 

नगर रस्त्यावरील प्रभाग 3, 4, 5 मध्ये बदल झाल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आता प्रभाग चारमधून निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. या प्रभागांतील बदल भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आमदार जगदीश मुळीक यांच्यामार्फत झाल्याची टीका "राष्ट्रवादी'कडून होत आहे. 

औंध-बोपोडी प्रभाग 8 मध्ये गेलेला पंचवटी हा सुमारे अडीच हजार मतदारांचा भाग प्रभाग 9मध्ये (बाणेर, बालेवाडी, पाषाण) समाविष्ट झाल्यामुळे भाजपला हायसे वाटत आहे; तर, मेडीपॉइंट, विधाते वस्ती हा एरवी अनुकूल असलेला भाग प्रभाग 8 मध्ये गेल्यामुळे "राष्ट्रवादी'ची चिंचा वाढली आहे. 

कर्वे रस्त्यावरील एसएनडीटीजवळील मेगासिटी हा झोपडपट्टी पुनर्वसनाचा भाग प्रभाग 13मधून काढून प्रभाग 11ला (रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर) जोडला गेल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभाग 20 ताडीवाला रोडमधील लडकतवाडी हा भाग प्रभाग 21ला (कोरेगाव पार्क-घोरपडी) जोडून कॉंग्रेसचे मतदान कमी करण्याचा भाजपने डाव खेळल्याची टीका त्यांच्याकडून होत आहे. 

प्रभाग 32 वारजे माळवाडीतील आचार्य सोसायटी, पीएमटी सोसायटी, डॉ. आंबेडकर पुतळा परिसर भाग प्रभाग 31ला (कर्वेनगर) जोडण्यामागे भाजपचे पारडे जड करण्याचा उद्देश असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

सिंहगड रस्त्यावरील प्रभाग 33 (वडगाव धायरी-सनसिटी) आणि प्रभाग 34 (वडगाव बुद्रुक- हिंगणे खुर्द) यांची फेररचना झाल्याने भाजपच्या विद्यमान सदस्यांना फायदा; तर "राष्ट्रवादी'पुढे मनसेचे आव्हान निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. प्रभागाची फेररचना झाल्यामुळे या परिसरात भाजपने साखर वाटून आनंद व्यक्त केला आहे. या बदलासाठी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे. 

प्रभागरचनेतील बदलामुळे सर्वाधिक राजकीय उलथापालथ प्रभाग 38 (बालाजीनगर-राजीव गांधी उद्यान), प्रभाग 40 (आंबेगाव दत्तनगर- कात्रज गावठाण) आणि प्रभाग 41मध्ये (कोंढवा बुद्रुक- येवलेवाडी) होणार आहे. भाजपचे आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर यांचे प्रयत्न त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. 

"राष्ट्रवादी'चे प्राबल्य असलेल्या 38मध्ये आता मनसेचे वसंत मोरे यांचे पॅनेल माजी महापौर धनकवडे यांना आव्हान देईल; तर प्रभाग 40 मध्ये अपेक्षित पक्षांतर होऊन भाजपच्या नियोजित उमेदवारांसाठी वातावरण अनुकूल झाल्याचे सांगण्यात येत आहे; तर प्रभाग 41 मधील बदल हे भाजपचे पारडे जड करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. 

भाजप आमदारांची भूमिका महत्त्वाची 
प्रभागरचना निश्‍चित करताना भाजपच्या शहरातील आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या एका नगरसेवकाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला मुंबईतील उच्चपदस्थ राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होता. या संदर्भात मोबाईलवर चर्चा न करता प्रत्यक्ष भेटीतच नियोजित बदलांबाबत भूमिका निश्‍चित करण्याचा पक्षाचा आदेश होता. मात्र, या प्रक्रियेत पालकमंत्र्यांनी शिफारस केलेल्या प्रभाग 16 आणि प्रभाग 29 मध्ये बदल झाले नाहीत, असाही दाखला भाजपमधील एका गटाने दिला. "या चर्चेत तथ्य असल्याबद्दल शंका व्यक्त होत असली तरी, झालेले बदल बघितले तर त्यातील तथ्य लक्षात येईल,' अशी बोलकी प्रतिक्रिया भाजपच्या एका नेत्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com