औंधमधील नवदांपत्यावर महाबळेश्‍वरला जाताना हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

औंध - महाबळेश्वर येथे फिरायला गेलेल्या नवदांपत्यावर वाई (जि. सातारा) परिसरातील पसरणी घाटात चार अज्ञात तरुणांनी कोयत्याने वार केले. यात तरुणाचा मृत्यू झाला असून, तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

औंध - महाबळेश्वर येथे फिरायला गेलेल्या नवदांपत्यावर वाई (जि. सातारा) परिसरातील पसरणी घाटात चार अज्ञात तरुणांनी कोयत्याने वार केले. यात तरुणाचा मृत्यू झाला असून, तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

आनंद ज्ञानदेव कांबळे (वय २७) व दीक्षा आनंद कांबळे (वय २४, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, औंध) यांच्यावर हा हल्ला झाला असून, यात आनंदचा मृत्यू झाला आहे. आनंद व दीक्षा आपल्या एका सहकारी जोडप्यासह महाबळेश्वर येथे इनोव्हा गाडीतून जात होते. पसरणी घाटात दुपारी साडेतीनच्या सुमारास चार तरुणांनी गाडी अडवून दोघांवर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने आनंदला स्वसंरक्षणाची संधीच मिळाली नाही. यात आनंद गंभीर जखमी झाला. हल्ला झाल्यानंतर दोघांनाही सातारा येथे दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच आनंदचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले, तर दीक्षा ही जखमी झाली आहे.

या घटनेची माहिती त्यांच्यासोबत असलेले राजेश भगवान बोबडे व कल्याणी बोबडे यांनी वाई पोलिसांना दिली. या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. वाई पोलिस तपास करत आहेत.

आरपीआयचा पदाधिकारी
आनंद कांबळे हा पुणे शहर आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडीचा पदाधिकारी होता. त्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चौकातच वाहनांच्या नंबरप्लेट बनवण्याचे दुकान आहे. आपल्या भावासह तो हे दुकान चालवायचा. आनंद व दीक्षाचा २१ मे रोजी विवाह झाला होता. आनंदवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तातडीने अटक करावी व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी प्रतिक्रिया आरपीआयचे पुणे शहर उपाध्यक्ष रमेश ठोसर यांनी दिली.

Web Title: anand kamble murder crime