पुरुषोत्तम मासातील अन्नदान यज्ञ 

प्रसाद पाठक
मंगळवार, 22 मे 2018

पुणे :  नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान येथे गेली शंभर ते सव्वाशे वर्षांपासून दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात हरिनाम महोत्सव साजरा होतो. महिनाभर दररोज विठ्ठल रुक्‍मिणीची काकड आरती, अभिषेक, महापूजा झाल्यावर गाथा पारायण, प्रवचन, कीर्तन तर असतेच. मात्र, सलग तीस दिवस अन्नदाते अन्नदान करतात. अन्नदानाच्या शतकोत्तर परंपरेत अनेकांनी दात्याची भूमिका बजावली असून, ही अखंड अन्नदान सेवा देवस्थानने जपली आहे. 

दर तीन वर्षांनी वेगवेगळ्या महिन्यांना जोडून अधिक महिना येतो. यंदा (16 मेपासून) अधिक ज्येष्ठ महिना सुरू झाला. या दिवसापासून या मंदिरात हरिनाम महोत्सवास सुरवात झाली. येथे धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अधिक महिना साजरा करण्यात येतो. जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, बंकटस्वामी यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली. अधिक महिन्यात घालावयाच्या भोजनावळीकरिता महिनाभर आधीच अन्नदाते देवस्थानकडे त्यांची नावे कळवितात. अनेक वर्षांपासून नियमित अन्नदान करणारेही दाते आहेत. त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे ही मंडळी अन्नदानाचा खर्च देवस्थानला देतात. दररोज मिष्टान्न भोजनाचा निरनिराळा बेत असतो. 

मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, ""सुरवातीला वारकरी शिक्षण मंडळाचे काम या मंदिरातूनच चालत असे. आता आळंदी येथून चालते. त्या वेळी अडीचशे-तीनशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत असत. तेव्हापासून दर तीन वर्षांनी मंदिरात अधिक महिन्यात हरिनाम महोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. किराणा मालापासूनचा सर्व खर्च दानशूर व्यक्ती देतात. पहाटे काकडआरती अभिषेक, पूजा होते. त्यानंतर एकनाथी भागवत पारायण, तुकाराम गाथा पारायण व भजने होतात. दुपारी भोजनानंतर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हरिपाठ होतो. सहा ते साडेसात वाजता महाडकरशास्त्री अधिक महिन्यातील प्रत्येक दिवसाचे माहात्म्य सांगतात. सायंकाळी सात ते नऊदरम्यान कीर्तन होते. असा संपूर्ण दिवसाचा दिनक्रम असतो. त्याला शतकोत्तर परंपरा लाभली असून, विविध धर्माचे नागरिक महाप्रसादाचा आस्वाद घेतात.'' 
 
Web Title: anandadan yadyna in purushottam Month