आनंदनगरमध्ये पदपथावर मेट्रोचे स्थानक

विनायक बेदरकर 
बुधवार, 24 जुलै 2019

जागा उपलब्ध होत नसल्याने पदपथावर स्थानकाचे काम करण्यात येत आहे. नियोजनानुसारच काम सुरू आहे. काम करताना नागरिकांना आणि स्थानिक व्यावसायिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.
- प्रशांत कुलकर्णी, प्रकल्प व्यवस्थापक, मेट्रो 

कोथरूड - वनाज ते रामवाडी टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे; मात्र पौड रस्त्यावरील आनंदनगर येथील पदपथावरच मेट्रोचे स्थानक उभारले जात असल्याने पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे, तसेच व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.

पौड रस्ता आधीच गर्दीने गजबजलेला आहे. त्यातून नागरिक जीव मुठीत धरून मार्गक्रमण करतात. अशातच मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक झाल्यानंतर केवळ अर्धा ते एक फुटाचा पदपथ शिल्लक राहणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन येथील नियोजन करायला हवे.

या स्थानकामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथच शिल्लक राहिलेला नाही. तसेच शेजारील दुकाने आणि मेट्रो स्थानकाचा जीना यामध्ये केवळ चार ते पाच फुटांचे अंतर शिल्लक राहिले आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची छोट्या व्यावसायिकांची तक्रार आहे.

व्यावसायिक उदय भालेराव यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना भेटून निवेदन दिले आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनादेखील त्यांनी वारंवार निवेदन दिले आहे; मात्र मेट्रोकडून त्यांना कोणताच प्रतिसाद देण्यात आला नाही. याबाबत बोलताना नागरिक अनिरुद्ध खांडेकर म्हणाले, ‘मेट्रो प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवे. पादचाऱ्यांना पदपथ शिल्लक न राहिल्यास भविष्यात गर्दीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करायला हवी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anandnagar Footpath Metro Station