Robbey Case | अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेतील दरोड्याचा प्राथमिक तपास पूर्ण; मनोज लोहिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Lohia
अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेतील दरोड्याचा प्राथमिक तपास पूर्ण; मनोज लोहिया

अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेतील दरोड्याचा प्राथमिक तपास पूर्ण; मनोज लोहिया

नारायणगाव - अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेतील दरोड्याचा प्राथमिक तपास झाला असून हा गुन्हा सराईत गुन्हेगारांनी केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हेगार कोणत्या दिशेने आले व घटनेनंतर कोणत्या दिशेने गेले ही माहिती मिळाली आहे.

या ठिकाणी व इतर ठिकाणी झालेल्या दरोड्याच्या आशा घटनेत साम्य दिसून येत आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.

बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या दोन सशस्त्र दरोडेखोरांनी चौदा नंबर येथील अनंत ग्रामिण पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्यावर गोळीबार करून पतसंस्थेतील सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम लुटली. या घटनेत भोर यांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. दरोडा टाकल्या नंतर आरोपी जांबुत फाटा मार्गे बोरी बुद्रुकच्या दिशेने गेले. आरोपींनी वापरलेले दोन हेल्मेट, कपडे बोरी बुद्रुक येथे रात्री पोलिसांना आढळून आले. आज सकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.या वेळी आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे, अनंत ग्रामिण पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम भोर उपस्थित होते.या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली.

हेही वाचा: राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचा ठिय्या

दरम्यान, दरोडेखोरांच्या हल्ल्यात ठार झालेले अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर ( वय ५२) यांच्यावर चौदा नंबर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भोर हे अनंत ग्रामिण पतसंस्थेच्या स्थापनेपासून मागील तीस वर्षा पासून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. ते तालुक्यातील पतसंस्थाना मार्गदर्शन सुद्धा करत होते. आपल्या सेवेशी प्रामाणिक असलेले राजेंद्र भोर यांच्या मृत्युमुळे तालुक्यातील पतसंस्थाचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र भोर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तालुक्यातील पतसंस्थेच्या माध्यमातून निधी संकलन करून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आज तालुक्यातील पंधरा पतसंस्थाचे कर्मचारी व पदाधिकारी यांनी ५५ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. अशी माहिती पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली अधिकारी राजू लोखंडे यांनी दिली.

आमदार बेनके म्हणाले ही घटना तालुक्यातील शांतता भंग करणारी आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरू केला आहे. आशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी उपयोजना करण्यासाठी पतसंस्थाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल.

loading image
go to top