आता अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’

गजेंद्र बडे
मंगळवार, 21 मे 2019

अंगणवाड्यांची माहिती 
पुणे जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या - ४,५०० 
सेविका आणि मदतनिसांची संख्या - ९,००० 
एकात्मिक बालविकास प्रकल्पांची संख्या - २१ 
पर्यवेक्षिकांची संख्या - १६०

पुणे - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत.

‘कॅस’च्या माध्यमातून अंगणवाडी किती वाजता उघडली, केव्हा बंद केली, बालकांची उपस्थिती, सेविकांच्या गृहभेटी, गर्भवती व स्तनदा मातांची ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. दरम्यान, या सॉफ्टवेअर हाताळणीबाबतचे पहिल्या टप्प्यातील चारदिवसीय प्रशिक्षण मावळ तालुक्‍यातील मळवली येथे सुरू केले आहे. 

यामध्ये सर्व तालुक्‍यांचे बालविकास अधिकारी, जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका (सुपरवायझर) आणि जिल्ह्यातील प्रत्येक बालविकास प्रकल्पातील प्रत्येकी एक अंगणवाडीसेविका अशा २०० जणांचा समावेश केला आहे. हे या सॉफ्टवेअरचे मास्टर ट्रेनर्स असणार आहेत. ते अन्य सर्व सेविकांना तालुकास्तरावर याबाबतचे प्रशिक्षण देणार आहेत. 

या संगणक प्रणालीमुळे सेविकांना आता त्यांच्या सर्व गृहभेटी, बालकांची उपस्थिती आदींसह अंगणवाडीशी संबंधित सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची छायाचित्रे व संबंधित विषयाची माहिती मोबाईलच्या माध्यमातून ‘कॅस’ या संगणक प्रणालीवर अपलोड करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अंगणवाड्यांसाठी ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ कार्यान्वित करणार आहे. यासाठी सर्व सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप करणार आहे. पहिल्या टप्प्यात पर्यवेक्षिका आणि २१ सेविकांना स्मार्ट फोन दिला आहे. ॲप्लिकेशन हाताळणीबाबतचे प्रशिक्षणही सुरू केले आहे. त्यानंतर सर्व सेविकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट होण्यास मदत होईल.
- दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi Smart Phone