esakal | महिला दिनाआधी अंगणवाडीसेविकांना लवकरच थकीत मानधन

बोलून बातमी शोधा

Anganwadi workers will soon be paid before honorarium}

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रश्नांबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नवी मुंबई येथील कार्यालयात बैठक घेतली.

महिला दिनाआधी अंगणवाडीसेविकांना लवकरच थकीत मानधन
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : ''जागतिक महिला दिनापूर्वी अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन देण्यात येईल. तसेच, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मासिक पेन्शन देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला लवकरच सादर करण्यात येईल,'' असे आश्वासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे अंगणवाडी कृती समितीच्यावतीने आयोजित राज्यव्यापी आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रश्नांबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नवी मुंबई येथील कार्यालयात बैठक घेतली. या वेळी चर्चेत समितीच्या पदाधिकाऱ्यांपैकी नितीन पवार, एम. ए. पाटील, दिलीप उटाणे, अरमायटी इराणी, धोंडीबा कुंभार यांनी सहभाग घेतला. तर, आयुक्तालयाकडून मालो यांच्यासह उपायुक्त (अंगणवाडी प्रशासन) विजय क्षीरसागर, सहायक आयुक्त संध्या नगरकर सहभागी झाले होते. कृती समिती संलग्न संघटनांचे राजेश सिंह, विठा पवार, संगीता कांबळे हे पदाधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे मानधन निधीअभावी थकीत आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येत्या आठ मार्च या जागतिक महिला दिनापूर्वी थकीत मानधन मिळेल. तसेच, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्याबाबत महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची सकारात्मक भूमिका आहे. त्यांनी आयुक्त कार्यालयाला पेन्शन योजनेबाबत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त कार्यालय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याबाबत प्रस्ताव तयार करून महिला व बाल विकास विभागाला लवकरच सादर करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कोरोना संसर्गामुळे मृत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासन निर्णयानुसार ५० लाख रुपये विमा भरपाई देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.