रांजणगावात अंगारकीनिमित्त गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

तळेगाव ढमढेरे - तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महागणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे महागणपतीच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. 

तळेगाव ढमढेरे - तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महागणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे महागणपतीच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. 

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विजयराज दरेकर, उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे, रमाकांत शेळके,
बाळासाहेब गोरे, पुजारी प्रसाद व मंदार कुलकर्णी आणि देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी यांनी चतुर्थीचे उत्कृष्ट संयोजन केले. रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४५ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी मंदिर परिसरात तैनात केले होते. प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे मुख्य गाभारा व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ट्रस्टतर्फे महागणपतीच्या मूर्तीला आकर्षक पोशाख व सुवर्णालंकार परिधान करण्यात आला होता. बाभूळसर येथील गणेशभक्त मच्छिंद्र सुपेकर यांच्यातर्फे मंदिरातील सर्व भाविकांना खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले. आजच्या अंगारकी चतुर्थीसाठी परिसरातील हजारो भाविकांनी पायी वारी करून महागणपतीचे दर्शन घेतले. नववधू-वरांची गणपतीच्या दर्शनाला विशेष उपस्थिती जाणवली. सकाळी महागणपतीची सामूहिक आरती झाली. 

सात लाखांची देणगी जमा  
देवस्थान ट्रस्टतर्फे पिण्याचे पाणी, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, दर्शनबारीची सुसज्ज व्यवस्था, हिरकणी कक्ष आदींची सुविधा केली होती. अंगारकी चतुर्थीनिमित्त व नाताळ सुटीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. दरम्यान, गेल्या १५ दिवसांच्या गुप्तदान पेटीत सुमारे ७ लाख रुपयांची भाविकांनी दिलेली देणगी जमा झाल्याची माहिती अध्यक्ष ॲड. विजयराज दरेकर यांनी सांगितली.

Web Title: Angaraki Chaturthi Ranjangav Ganpati