पशू, पक्षी, प्राणी का नष्ट झाले?

अवधूत कुलकर्णी
मंगळवार, 22 मे 2018

पिंपरी - शहरात कोणती झाडे, वनस्पती, पशू, पक्षी, प्राणी, जलचर होते, त्यापैकी कोणते नष्ट झाले आणि का, उपाययोजना आदी बाबतचा सविस्तर अहवाल महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात जैवविविधतेची पाहणी करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. 

पिंपरी - शहरात कोणती झाडे, वनस्पती, पशू, पक्षी, प्राणी, जलचर होते, त्यापैकी कोणते नष्ट झाले आणि का, उपाययोजना आदी बाबतचा सविस्तर अहवाल महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात जैवविविधतेची पाहणी करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. 

सरकारच्या आदेशानुसार महापालिकेच्या वतीने गतवर्षी जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये अध्यक्षा उषा मुंढे यांच्यासह आठ सदस्य आहेत. शहराच्या जैवविविधतेची माहिती गोळा करणे, त्याचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करणे या समितीकडून अपेक्षित आहे. त्यासाठी समितीला सरकारकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही.

जैवविविधतेच्या पाहणीविषयी सल्लागार संस्था नेमण्यात येणार आहे. त्यासाठी या सध्याच्या समितीपुढे दोन एजन्सींनी याबाबतचे सादरीकरण केले आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. पुण्यातील सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट या संस्थेसह मुंबईतील एका सल्लागार संस्थेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामात रस दाखविला आहे. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या संदर्भात निविदा मागविल्या होत्या. केवळ दोनच एजन्सींनी निविदा भरल्या. त्यानंतर पुन्हा निविदा मागविल्या आहेत. सल्लागार संस्थेकडून जैवविविधतेचा सविस्तर अहवाल मिळणे अपेक्षित आहे. उदा. एखादे फुलपाखरू नष्ट झाले असल्यास कोणत्या झाडावर ते बसायचे, ती झाडे नष्ट झाल्यामुळे ते फुलपाखरू नष्ट झाले का? तशा प्रकारची झाडे लावल्यास फुलपाखरे पुन्हा येऊ शकतील का? याबाबतची माहिती अहवालाद्वारे मिळणे अपेक्षित आहे.

नेमलेल्या सल्लागार संस्थेकडून शहराच्या जैवविविधतेची पाहणी करण्यात येईल. त्याची नोंदवही केली जाईल. कृती आराखडाही सादर केला जाईल. त्यानंतर कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल.
- संजय कुलकर्णी, सहायक आयुक्त, महापालिका पर्यावरण विभाग 

काही कंपन्यांकडून त्यांचे दूषित पाणी नदीत सोडण्यात येते. अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये जागृती करणार आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहकार्य घेणार आहे. तसेच, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधतेबद्दल जागृती करण्याचे काम करत आहे.
- उषा मुंढे, अध्यक्षा, जैवविविधता व्यवस्थापन समिती

Web Title: animal bird Destroyed