लाजवंती वानर, चांदी अस्वल, तीक्ष्ण वर्ण मांजर

सुशांत सांगवे - @sushantsangwe
बुधवार, 11 जानेवारी 2017

प्राण्यांना मराठी नावे; मारुती चितमपल्ली यांच्याकडून प्राणी कोश

पुणे - आपण प्राणिसंग्रहालयात किंवा जंगलात जाऊन प्राणी पाहतो; पण अनेक प्राण्यांची नावे आपल्याला माहिती नसतात. बहुतांश नावे इंग्रजीमधूनच माहिती असतात. परंतु, आता भारतातील सर्वच प्राण्यांना मराठी नाव मिळणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी या प्राण्यांना मराठी नावांची ओळख दिली असून, ती प्राणी कोशातून लवकरच वाचकांसमोर येणार आहे. तसेच, या कोशाचे लेखन संपताच त्यांनी मत्स्य कोश आणि वृक्ष कोशाच्या संकलनाचे काम हाती घेतले आहे.   

जंगलात राहून मराठी साहित्याची सेवा करणारे चितमपल्ली यांना राज्य सरकारचा ‘विंदा करंदीकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यानिमित्ताने ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. वयाच्या पासष्टीनंतर अनेक जण निवृत्तीचे आयुष्य जगतात; पण चितमपल्ली वयाच्या ८५व्या वर्षातही तितक्‍याच ताकदीने लेखन-संशोधन करत आहेत. त्यांनी नुकताच प्राणी कोश लिहून तयार केला असून, तो सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 

कोशाचे वेगळेपण सांगताना ते म्हणाले, ‘‘हा कोश इंग्रजी-मराठीपुरता मर्यादित आहे, असे नाही. हिंदी, गुजराती, तमीळ, कन्नड, तेलुगू अशा १८ भारतीय भाषांत ‘प्राण्यांना कुठली नावे आहेत’, हे या कोशात आहे. शिवाय, प्रत्येक प्राण्याचे आणि त्याच्या उपप्रकारातील प्राण्याचे छायाचित्र, त्याचे वर्णन करणारा परिच्छेदही आहे. त्यामुळे हा कोश वेगवेगळ्या भाषांतील अभ्यासकांना उपयोगी पडणार आहे. तो आकाराला आणण्यासाठी मला ७ ते ८ वर्षे मेहनत करावी लागली.’’ 

नव्या १५ हजार शब्दांची भर
‘‘भारतात जवळजवळ ४५० प्रकारचे प्राणी आणि त्यांचे असंख्य उपप्रकार आहेत. यातल्या बहुतांश प्राण्यांची नावे इंग्रजीत आहेत. (उदा. गोल्डन लंगूर, मार्टिन, रॅटेल, कॅरेकल, डॉनफिन) जंगलात, आदिवासी भागात, वाड्यावस्तीत जाऊन या प्राण्यांच्या मराठी नावांचे संकलन करण्यात आले आहे. ज्यांना मराठी नाव नाही, त्यांना मराठी नाव दिले आहे. त्यामुळे आता लाजवंती वानर, चांदी अस्वल, तीक्ष्ण वर्ण मांजर, भुई अस्वल, झाड चिचुंद्री अशा वेगवेगळ्या नावाने प्राण्यांना मराठीतून हाक मारता येईल.

यानिमित्ताने मराठीत नव्या १५ हजार शब्दांची भर पडत आहे,’’ असे मारुती चितमपल्ली यांनी सांगितले.

आजचे लेखक जंगलात राहायला तयार होत नाहीत. जंगलाचा अभ्यास करत नाहीत; मग अस्सल साहित्य कसे तयार होणार? वरवरचे लेखन नको असेल, तर त्यासाठी आधी लेखकांना जंगलात, रानात राहावे लागेल. मेहनत घ्यावी लागेल. 
- मारुती चितमपल्ली, साहित्यिक

Web Title: animal name directory